भोकर SBI दरोड्याचा थरारक शेवट : ३६ कोटी ४८ लाखांचा मुद्देमालासह चार दरोडेखोर जेरबंद!
पोलिसांची तत्परता अन् नागरिकांचे सहकार्य ठरले निर्णायक; पोलीस अधिक्षकांनी दिली माहिती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर भरदुपारी करण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र, जळगाव पोलिसांची सतर्कता, तातडीने केलेली नाकाबंदी आणि स्थानिक नागरिकांचे मोलाचे सहकार्य यामुळे या थरारक घटनेचा अवघ्या काही तासांत पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत चार सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दरोड्यातील १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरोड्यातील ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल, त्यात सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड, पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, दरोडेखोरांनी बँकेत गोळीबार करून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपींच्या मुसक्या आवळल्याने मोठे यश मिळाले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

हेल्मेट, मास्क लावून बँकेत प्रवेश; बंदुकीचा धाक दाखवत दरोडा
दि.३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजेच्या सुमारास चार अज्ञात इसमांनी हेल्मेट आणि तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून भोकर येथील SBI बँकेत प्रवेश केला. आरोपींकडे बंदूक, धारदार चाकू आणि लाकडी दांडका अशी हत्यारे होती. बँकेत प्रवेश करताच आरोपींनी शाखा व्यवस्थापक जयेश दगडू राणे, कॅशियर रणजित मराठे, क्लार्क ऋषिकेश भगत, सुरक्षा रक्षक संदीप कोळी, शिपाई समाधान वराडे, एफओएस सुनील शिरसाठ आणि शिपाई रघुनाथ ठाकरे यांना शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. यावेळी कर्मचाऱ्यांना मारहाणही करण्यात आली.
बंदुकीतून झाडली गोळी, दागिने लुटले
दरम्यान, बँकेचे सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी शंकर जासक याने त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बंदुकीतून गोळी झाडली. या घटनेमुळे बँकेत एकच गोंधळ उडाला. त्यानंतर आरोपींनी बँकेच्या स्ट्राँग रूममधील लॉकरमधून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड बॅगांमध्ये भरून घटनास्थळावरून पलायन केले.
३६ कोटी ४८ लाखांचा मुद्देमाल लंपास
दरोडेखोरांनी बँकेतून १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच सुमारे २७ किलो वजनाचे तारण ठेवलेले सोन्याचे दागिने लुटले. सोन्याचे दागिने एकूण ८७१ बॅगमध्ये होते. या सोन्याचे मूल्य ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारे रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी लंपास केला होता.
संभाजी पवार यांचा फोन; पोलिसांनी हलवली सूत्रे
भोकर येथील घटनेची माहिती भोकर महिला पोलीस पाटील यांचे सासरे संभाजी पवार यांनी दुपारी ३.१७ वाजता पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दूरध्वनीवरून दिली. माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. नांद्रा बीटचे पोलीस अंमलदार, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने धरणगाव, चोपडा, यावल आणि अडावद या मार्गांवर पाळत ठेवण्यात आली. तसेच पोलीस नियंत्रण कक्षाला तातडीने अलर्ट देण्यात आला. डिकसाई येथे कडक नाकाबंदी करण्यात आली.
डिकसाई येथे दोघे जेरबंद; नागरिकांची मोलाची मदत
नाकाबंदीदरम्यान संशयित वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण), वय २५, रा. खापरखेडा, ता. खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश आणि अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या दोघांना मुद्देमालाच्या बॅगांसह ताब्यात घेतले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, नांद्रा बीटचे हवालदार दीपक चौधरी, दिनेश चव्हाण आणि पोलीस कर्मचारी प्रवीण कोळी यांनी ही कारवाई केली. यावेळी स्थानिक नागरिक सागर दिलीप कोळी आणि भगवान भावलाल कोळी यांनीही पोलिसांना सहकार्य केले.
धरणगाव पोलिसांची नाकाबंदी; उर्वरित दोघांच्याही मुसक्या आवळल्या
पकडण्यात आलेल्या संशयीत आरोपींची चौकशी केली असता, त्यांचे अन्य साथीदार धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तातडीने जळगाव नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. धरणगाव पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक उमाकांत रमाकांत गायकवाड यांनी आपल्या पथकासह धरणगाव मार्गावर नाकाबंदी केली. या कारवाईत गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा.न्यायडोंगरी, ता.नांदगाव, जि.नाशिक) आणि शंकर रमेश जासक (वय ४२, रा.मन्यारखेडा, ता.जळगाव) या उर्वरित दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. धरणगाव पोलिसांचे हवालदार सत्यवान पवार, पोलीस कर्मचारी मनोज पाटील तसेच स्थानिक नागरिक चेतन पाटील आणि बन्सी पाटील यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.
कोण आहेत अटक केलेले चार संशयीत आरोपी?
जळगाव तालुका आणि धरणगाव पोलिसांच्या समन्वयातून चारही संशयीत आरोपींना काही तासांतच बेड्या ठोकण्यात आल्या. पोलिसांनी अटक केलेले तीन संशयीत आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यांच्यावर यापूर्वीही विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण), वय २५ रा.खापरखेडा, ता.खकनार, जि. बुरहानपूर, मध्य प्रदेश याच्यावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये भादंवि कलम ३९९, ४०२, ३४ आणि आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल तर जामनेर पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये दरोडा आणि शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल आहे. गजानन राजेंद्र पवार, वय ३२, रा.न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि.नाशिक याच्यावर चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात २०२४ मध्ये भादंवि कलम ३०२, २०१, १२०-ब अन्वये खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. शंकर रमेश जासक, वय ४२ रा.मन्यारखेडा, ता. जळगाव याच्यावर शनीपेठ पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये दरोडा आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. अंकुश श्रावण चव्हाण, वय ३० रा.रामदेववाडी, ता. जळगाव याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबाबत अधिक तपशील उपलब्ध नाही.
२७ किलो सोने, १२ लाखांची रोकड आणि दोन वाहने जप्त
या कारवाईत पोलिसांनी दरोड्यातील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती दिली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम १२,२६,५००, सोन्याचे दागिने सुमारे २७ किलो एकूण मूल्य ३६,३६,२३,००० असा एकूण मुद्देमाल ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा आहे. पोलिसांनी पल्सर क्रमांक TS.13.ER.5554 आणि होंडा शाईन क्रमांक MH.41.BY.6121 ही हस्तगत केली आहे.
जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), १०९(१), १२७(२), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३/२५ आणि ३/२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी राहुल गायकवाड, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, धरणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उमाकांत गायकवाड, एपीआय नयन पाटील, पोलीस उपनिरीक्षक बडगुजर, जितेंद्र वलटे, स.फौ. अतुल वंजारी यांच्यासह जळगाव तालुका व धरणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. तसेच पोलीस कर्मचारी सुनील पाटील, प्रदीप राजपूत, प्रवीण पाटील, दीपक चौधरी, दिनेश चव्हाण, नरेंद्र पाटील, आशीष चौधरी, गुलाब माळी, प्रवीण कोळी, प्रशांत ठाकूर, मिलिंद सपकाळे, दीपक देवरे, गणेश पाटील, तुषार जोशी, चालक अशोक पाटील, बापू कोळी आणि इतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या मोहिमेत स्थानिक नागरिक सागर कोळी, भगवान कोळी, चेतन पाटील आणि बन्सी पाटील यांचे सहकार्यही निर्णायक ठरले.
पोलिसांची तत्परता आणि नागरिकांच्या सतर्कतेचे कौतुक
भरदिवसा, शस्त्रांचा धाक दाखवून आणि गोळीबार करून करण्यात आलेल्या या दरोड्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदीचे जाळे विणले. विविध पोलीस ठाण्यांमधील समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे चारही आरोपींना अटक करून कोट्यवधींचा मुद्देमाल सुरक्षित हस्तगत करण्यात आला.






