धक्कादायक : परप्रांतीय नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
जुने जळगावातील घटना; अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह


धक्कादायक : परप्रांतीय नवविवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
जुने जळगावातील घटना; अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झाला होता विवाह
जळगाव प्रतिनिधी : जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरात राहणाऱ्या एका परप्रांतीय नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
झीलीक तपन मंडल, रा. पश्चिम बंगाल, असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. झीलीक हिचा विवाह सनाजीत नारायणचंद्र संत्रा यांच्यासोबत अवघ्या पाच महिन्यांपूर्वी झाला होता. विवाहानंतर महिनाभरापूर्वी हे नवदांपत्य रोजगाराच्या निमित्ताने जळगाव शहरात राहण्यासाठी आले होते.
सनाजीत संत्रा हे शहरातील एका ठिकाणी सोने कारागीर म्हणून काम करीत होते. सोन्याचे दागिने बनविण्याच्या कामातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. नव्या संसाराला सुरुवात होऊन काही काळच लोटला असताना ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, रविवारी सायंकाळी पती-पत्नीमध्ये काही किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सनाजीत हे त्यांच्या मालकाकडे जेवणाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर गेले होते. पती घराबाहेर गेल्यानंतर झीलीक हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या प्रकरणी शनीपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. झीलीक हिने नेमक्या कोणत्या कारणातून हे टोकाचे पाऊल उचलले, याचा तपास शनीपेठ पोलिसांकडून सुरू आहे.







