जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड

जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची आठव्यांदा बिनविरोध निवड
उपाध्यक्षपदी संदीप बेदमुथा, तर कोषाध्यक्षपदी दिनेश मालू; पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची निवड
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव जिल्हा केमिस्ट संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची सलग आठव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. रविवारी (दि. २६ जुलै) केमिस्ट भवन येथे झालेल्या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड एकमताने करण्यात आली. याचवेळी संदीप बेदमुथा यांची उपाध्यक्षपदी, तर दिनेश मालू यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ पुढील तीन वर्षांचा असणार आहे.
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भानुदास नाईक, सुरेंद्र बोहरा (पारोळा) आणि अशोक जैन यांनी निवडणूक अधिकारी व मार्गदर्शक म्हणून काम पाहिले.
सुनील भंगाळे हे गेल्या २५ ते ३० वर्षांपासून संघटनेत विविध पदांवर कार्यरत असून, जिल्हा केमिस्ट संघटनेच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी प्रभावीपणे सांभाळली आहे. केमिस्ट बांधवांच्या हितासाठी सातत्याने काम करताना त्यांनी संघटनात्मक बळकटीसह विविध सामाजिक उपक्रमही राबविले आहेत. केमिस्ट हृदयसम्राट आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संघटनेचे कार्य जिल्ह्याबरोबरच राज्यभर पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संघटनेचे सचिव अनिल झंवर तसेच इतर पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आणि केमिस्ट सभासदांच्या विश्वासाच्या बळावर सुनील भंगाळे यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक सेवाभावी व समाजोपयोगी उपक्रम राबविले. केमिस्ट बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमीच उपलब्ध राहिल्याने त्यांना जिल्ह्यात विशेष मान्यता मिळाली आहे.
संघटनात्मक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सुनील भंगाळे यांचा जिल्हा तसेच राज्य पातळीवर विविध पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या आठव्यांदा झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल केमिस्ट बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






