काकडी तोडण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १३ जणांसह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा

काकडी तोडण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी; १३ जणांसह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध गुन्हा
भातखंडे (बु.) येथील घटना
भडगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील भातखंडे (बु.) येथे शेतातील काकडी तोडण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या प्रकरणी १३ नामनिर्देशित आरोपींसह अन्य ५ ते ६ जणांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २४ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता भातखंडे (बु.) येथील पीक संरक्षण संस्थेसमोरील रस्त्यावर ही घटना घडली. फिर्यादीचे भाऊ नितीन दयाराम पाटील आणि पुतणे दीपक नितीन पाटील यांच्या शेतातील काकडी काही जण तोडत असल्याचा विरोध केल्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच शिवीगाळ करून दमदाटीही करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.
याप्रकरणी अनिल दयाराम पाटील (वय ५६, व्यवसाय–शेती, रा. भातखंडे (बु.), ता. भडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यात रमेश सोमा नाईक, सुपडू तिरसिंग भिल, अरुण सुपडू भिल, संजय शिवा भिल, अनिल विक्रम मोरे, विकास रमेश सोनवणे, शाम आप्पा सोनवणे, नवल पोपट सोनवणे, आकाश बाळू मोरे, दिनकर प्रकाश भिल, दीपक प्रकाश भिल आणि नामदेव सुपडू भिल यांच्यासह अन्य ५ ते ६ जणांचा समावेश आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १९१(१), १९१(२), १९१(३), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.






