केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘ग्राहकदृष्टी’ दीपोत्सव विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या ‘ग्राहकदृष्टी’ दीपोत्सव विशेषांकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : वैचारिक आणि परिसंवादात्मक लेखनाची परंपरा जपणाऱ्या ‘ग्राहकदृष्टी’ दीपोत्सव २०२६ विशेषांकाचे प्रकाशन आज मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ‘केंद्र सरकारच्या तपपूर्ती अंतरंगात’ ही यंदाच्या विशेषांकाची मध्यवर्ती संकल्पना असून, यामध्ये मोदी सरकारच्या गेल्या बारा वर्षांतील कार्यप्रवासाचा सखोल आढावा घेण्यात आला आहे.
तब्बल २०० पानांचा हा आकर्षक ग्लेझ्ड विशेषांक वाचकांसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहे. गेल्या नऊ वर्षांपासून ‘ग्राहकदृष्टी’ने आपल्या दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण दिवाळी अंकांची शृंखला अखंडपणे सुरू ठेवली आहे. ‘परिसंवादात्मक विचारमंथन’ हे या विशेषांकाचे नेहमीच खास वैशिष्ट्य राहिले आहे.
यापूर्वी ‘ हा संघ करतो तरी काय ? ‘ ‘दिवे लागले रे’, ‘तिमिरतुनी तेजाकडे’, ‘देश विकास वाटांच्या पदचिन्हांवर’, ‘राष्ट्रपुरुष जागा होतोय’, ‘वसुधैव कुटुंबकम्’, ‘सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांच्या भारतीय खाद्य संस्कृती’ आणि ‘प्राजक्ता माळी यांच्या यश म्हणजे नक्की काय?’ अशा विविधांगी विषयांवर या अंकाने प्रकाश टाकला आहे. तसेच, ‘विश्वगुरू’ पदाकडे होणारी देशाची वाटचाल आणि ‘सर्वांगीण विकासाच्या वाटेवर कुठवर?’ यांसारख्या विचारप्रवर्तक विषयांतून टीम ग्राहकदृष्टीने नेहमीच समाजमनाचे प्रबोधन केले आहे. याच परंपरेला पुढे नेत यंदा केंद्र सरकारच्या तपपूर्तीच्या निमित्ताने विकासाचे अंतरंग उलगडण्यात आले आहेत.
मंत्रालयात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत ‘ग्राहकदृष्टी’चे संचालक मनीष अविनाश पात्रीकर आणि युथ आयकॉन व ब्रँडिंग एक्सपर्ट शिवानी गोहिल उपस्थित होत्या.
➖







