Other

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

चाळीसगाव येथे वारकर्‍यांसाठी ’डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी’तर्फे मोफत सेवा शिबिर

तीन दिंड्यांतील शेकडो वारकर्‍यांना सेवाभावातून आरोग्याचा उपहार

चाळीसगाव (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पायी प्रवास करणार्‍या वारकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथे मोफत फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाभाव, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा उत्कृष्ट प्रत्यय देणार्‍या या उपक्रमात तीन प्रमुख दिंड्यांमधील शेकडो वारकर्‍यांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.

दरवर्षी हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात. या दीर्घ प्रवासामुळे मान, पाठ, कंबर, गुडघे, पाय आणि सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंचा ताण तसेच शारीरिक थकवा जाणवणे ही सामान्य बाब असते. हीच गरज ओळखून महाविद्यालयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने वारकर्‍यांसाठी विशेष फिजिओथेरपी सेवा शिबिर आयोजित केले.शिबिरात वारकर्‍यांच्या शारीरिक तक्रारींचे सखोल मूल्यमापन करून आवश्यक त्या फिजिओथेरपी उपचारांद्वारे वेदना कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय स्नायू व सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, ताकद वाढविणारे व्यायाम, योग्य शरीरस्थिती राखण्याचे मार्गदर्शन तसेच पुढील प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.

अनेक वारकर्‍यांनी उपचारानंतर वेदना कमी झाल्याची भावना व्यक्त करत डॉक्टरांच्या सेवाभावाचे कौतुक केले.या सेवा शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उत्कर्ष भोळे, डॉ. सलोनी किर, डॉ. नयन शेटे आणि डॉ. सृष्टी तभाणे यांनी अत्यंत समर्पित भावनेने वारकर्‍यांची सेवा केली. प्रत्येक वारकर्‍याला आवश्यक ते उपचार व मार्गदर्शन मिळावे यासाठी डॉक्टरांच्या पथकाने दिवसभर अविरत कार्य केले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button