गावठी कट्ट्यासह एकाला जळगाव एमआयडीसी पोलिसांकडून अटक

महा पोलीस न्यूज । दि.८ जून २०२५ । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांनी एका व्यक्तीला गावठी कट्ट्यासह अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की, एक व्यक्ती गावठी कट्टा (अग्नीशस्त्र) बाळगून एकता मित्र मंडळ, साई सिटी, कुसुंबा शिवार परिसरात दहशत निर्माण करत आहे. माहितीच्या आधारे पथकाने एकाला अटक केली आहे.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे, नितीन ठाकुर, विशाल कोळी यांची एक टीम तयार केली. टीमला संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. पोलिसांनी एकता मित्र मंडळ, साई सिटी, कुसुंबा शिवार परिसरात शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी, एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. गुप्त बातमीनुसार खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
मित्राच्या घरी लपवला होता गावठी कट्टा
तपासादरम्यान, आरोपीने आपले नाव चेतन वसंता देवुळकार, वय २२ वर्ष, व्यवसाय मजुरी, रा.कुसुंबा, जळगाव असे सांगितले. पोलिसांनी त्याला परिसरात फिरण्याचे कारण विचारले, परंतु त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. अधिक चौकशीत, त्याने त्याच्याकडे गावठी कट्टा असून तो साई सिटी येथील एकता मित्र मंडळ येथील त्याच्या घरी ठेवल्याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी जाऊन दोन पंचांसमक्ष लोखंडी कपाटातून गावठी कट्टा जप्त केला.
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी, पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक ३२४/२०२५, आर्म अॅक्ट ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश घुगे करत आहेत.