जन्मदात्या बापाचे क्रौर्य! झोपेत असलेल्या दोन लेकरांवर कुऱ्हाडीने हल्ला
मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर : नराधम पित्याला घेतले ताब्यात

महा पोलीस न्यूज । मिलींद शेटे । जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. वडती गावात एका व्यक्तीने स्वतःच्या दोन मुलांवर झोपेत असताना कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
या हल्ल्यात मीरा सुभाष भिलाला (वय १३) हिचा जागीच मृत्यू झाला, तर रामु सुभाष भिलाला (वय ११) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी सुभाष गोपाळ भिलाला (वय ५०) हा घटना घडल्यानंतर जंगलाच्या दिशेने पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेतले. सध्या त्याच्याकडे घटनेसंदर्भात सखोल चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार, दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या अमानुष कृत्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती किंवा इतर कोणत्या कारणातून ही घटना घडली का, याचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण परिसरात भीतीचे आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे. अडावद पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चोपडा तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.







