

जळगाव जिल्हा रुग्णालयात आठ दिवसांत हिमोफिलियाचे फॅक्टर उपलब्ध होणार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांचे सकारात्मक आश्वासन
मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील हिमोफिलियाग्रस्त रुग्णांसाठी अत्यावश्यक असलेले जीवनरक्षक फॅक्टर उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, पुढील आठ दिवसांत जिल्हा रुग्णालयात फॅक्टर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी दिले आहे. तसेच मोहाडी येथील डे-केअर सेंटर शहरातील मध्यवर्ती नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यासह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत (MJPJY) हिमोफिलिया रुग्णांची नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हिमोफिलिया हा रक्तातील गुठळी निर्माण करणाऱ्या घटकांच्या कमतरतेमुळे होणारा जन्मजात व दुर्मीळ रक्तविकार आहे. या आजाराने ग्रस्त रुग्णांना दुखापत झाल्यास किंवा शरीराच्या अंतर्गत भागात रक्तस्त्राव झाल्यास तो सहज थांबत नाही. त्यामुळे अशा रुग्णांसाठी फॅक्टर VIII आणि IX हे केवळ औषध नसून जीवनरक्षक उपचार मानले जातात. रक्तस्त्राव सुरू झाल्यानंतर वेळेत फॅक्टर मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते.
फॅक्टर वेळेत उपलब्ध न झाल्यास सांध्यांमध्ये वारंवार अंतर्गत रक्तस्त्राव होऊन रुग्णांना कायमस्वरूपी अपंगत्व येण्याचा धोका असतो. तर मेंदू किंवा अन्य महत्त्वाच्या अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्त्राव झाल्यास परिस्थिती गंभीर होऊन रुग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांसाठी नियमित व तातडीने फॅक्टर उपलब्ध होणे ही अत्यंत महत्त्वाची मागणी होती.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात फॅक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातच सध्या डे-केअर सेंटर मोहाडी येथील महिला रुग्णालयात असल्याने आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना शहराबाहेर जाण्याची वेळ येत होती. गंभीर रक्तस्त्रावाच्या प्रसंगी हा विलंब रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर हिमोफिलिया सोसायटी धुळेच्या प्रतिनिधींनी, सदस्यांनी तसेच हिमोफिलिया रुग्णांनी जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट घेऊन विविध मागण्या मांडल्या.
या निवेदनाची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील सांगळे यांनी रुग्णांच्या अडचणी समजून घेत प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. पुढील आठ दिवसांत फॅक्टर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय हिमोफिलिया रुग्णांना उपचाराचा लाभ मिळण्यासाठी MJPJY अंतर्गत नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, मोहाडी येथील डे-केअर सेंटर नवीन जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित करण्यासाठीही तातडीने प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रशासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. फॅक्टरचा नियमित पुरवठा, शहराच्या मध्यवर्ती भागात डे-केअर सेंटर आणि शासकीय आरोग्य योजनेचा लाभ मिळाल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
निवेदन देतेवेळी महाराष्ट्र ॲडव्होकेसीचे जळगाव जिल्हा सदस्य धनंजय मंगरूळकर, ॲड. पवन नेवे, पत्रकार अतिक खान, संपादक गंगाधर बोदडे तसेच हिमोफिलिया रुग्ण सोहेल खान उपस्थित होते. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्यातील हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे हिमोफिलिया सोसायटीचे सचिव स्वप्नील पाटील यांनी सांगितले






