सेवा संकल्प अभियान उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून यशस्वीपणे राबवा


सेवा संकल्प अभियान उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून यशस्वीपणे राबवा
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या सूचना; १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम
जळगाव | प्रतिनिधी
लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच अभियानातील महत्त्वाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून ‘सेवा संकल्प अभियान’ प्रभावीपणे राबवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.
जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या पूर्वतयारीसंदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, उपविभागीय अधिकारी योगेश कुमार मीना, अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख प्रत्यक्ष उपस्थित होते. तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
प्रत्येक विभागाने स्वतंत्र नियोजन करावे
जिल्हाधिकारी घुगे म्हणाले, अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक विभागाने आवश्यक नियोजन करावे. तालुका स्तरावर तसेच शहरांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबवावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि त्यांच्या कार्यकाळातील ‘सेवा परमोधर्म’ या भावनेतून सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांची माहिती मिळण्याबरोबरच त्यांचा प्रत्यक्ष लाभ अधिक प्रभावीपणे मिळावा, यावर अभियानात भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘सेवा सेतू’तून विविध सेवांचा लाभ
अभियानांतर्गत ‘सेवा सेतू’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा, ‘जिवंत सातबारा’ मोहीम, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेंतर्गत सिंचन विहिरींसाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, दिव्यांग प्रमाणपत्र देणे तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते उपलब्ध करून देणे आदी उपक्रमांचा समावेश आहे.
या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी घुगे यांनी दिल्या.
युवकांसाठी ‘इनोव्हेशन चॅलेंज’
‘इनोव्हेशन चॅलेंज’च्या माध्यमातून जिल्ह्यातील युवा, विद्यार्थी, स्टार्टअप्स, व्यावसायिक, कॉर्पोरेटर्स तसेच ग्रामीण भागात नाविन्यपूर्ण सोल्युशन्स विकसित करणाऱ्यांना जोडण्यात येणार आहे.
‘सेवा माझे योगदान’ उपक्रमांतर्गत स्थानिक गरजेनुसार रक्तदान, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण आणि ॲनिमियाबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा
शासकीय तसेच खासगी शाळांमध्ये ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ‘मुलांच्या स्वप्नातील भारत’ आणि ‘विकसित भारत-२०४७’ या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत.
‘विकसित भारत संकल्प यात्रे’अंतर्गत ‘विकसित भारत-२०४७’ची सेवा ज्योत यात्रा बाइक रॅलीद्वारे काढून नागरिकांना माहिती देण्यात यावी. तसेच सर्व अंगणवाडी केंद्रांवर मुलांसोबत मातांना आमंत्रित करून महिलांना आरोग्य व पोषणाशी संबंधित योजनांची माहिती संबंधित विभागांनी द्यावी, असेही जिल्हाधिकारी घुगे यांनी सांगितले.
तालुका व ग्रामपंचायत स्तरावर उपक्रम
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमार्फत तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली.







