Politics

राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक संपन्न

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका यासह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनमंच पक्षाची जळगाव जिल्हा आढावा बैठक नुकतेच शासकीय विश्रामगृह, चाळीसगाव येथे यशस्वीपणे संपन्न झाली. या बैठकीला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिप लांडगे आणि प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थिती दर्शवली.

या जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठविणे, सामान्य नागरिकांच्या हितासाठी संघर्ष करणे आणि आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्यासाठी जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. पक्ष संघटनेची बांधणी मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. याचबरोबर पक्षाच्या धोरणांचा आणि विचारांचा प्रसार घराघरात पोहोचवण्यासाठी रणनीती आखण्यात आली.

संघटनात्मक बांधणीला बळकटी देणार
बैठकीदरम्यान पक्ष संघटनेचा विस्तार करण्याच्या उद्देशाने काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये सुरेश अर्जुन वेळीस यांची चाळीसगाव तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक देविदास वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नूतन तालुका अध्यक्ष सुरेश वेळीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राष्ट्रीय जनमंच पक्षाचे विचार आणि धोरणे प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. चाळीसगाव तालुक्यात पक्षाला एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी अहोरात्र मेहनत करेन आणि संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”

उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन
या बैठकीत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदिप लांडगे, प्रदेश प्रभारी संघटक देविदास वाघ आणि जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास हटकर यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाच्या उद्देशांवर प्रकाश टाकला आणि कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर सक्रिय होऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी पक्षाचे चाळीसगाव शहर उपाध्यक्ष शंकर सोनार, शहर सचिव सचिन शेटे, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र राज्य सदस्य नारायण कुमावत, राजेंद्र चींधा खेडकर, सुनील सूर्यवंशी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीमुळे राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला असून, आगामी काळात पक्षाच्या वाढत्या प्रभावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पक्षाचा पुढील दृष्टिकोन
राष्ट्रीय जनमंच पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी पक्षाने चाळीसगाव तालुक्यासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीला गती देण्याचे ठरवले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवण्यासाठी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button