PoliticsSocial

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

महापौर दीपमाला मनोज काळे यांचे जळगावकरांना आवाहन

जळगाव : लाडक्या बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, यंदाचा गणेशोत्सव जळगावकरांनी पर्यावरणपूरक, शिस्तबद्ध आणि सामाजिक सलोख्याच्या वातावरणात साजरा करावा, असे आवाहन जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला मनोज काळे यांनी केले आहे.

उत्सवादरम्यान शहराचे सौंदर्य, स्वच्छता आणि पर्यावरण अबाधित राखण्यासाठी नागरिक तसेच सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती महापौरांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

*पर्यावरणपूरक मूर्तींचा वापर* : जलप्रदूषण टाळण्यासाठी शक्यतो शाडूच्या किंवा नैसर्गिक रंगांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी. पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) मूर्तींऐवजी पर्यावरणास पूरक पर्यायांना प्राधान्य द्यावे.

*स्वच्छता व प्लास्टिक बंदी* : उत्सवादरम्यान मंडप परिसरात कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी. निर्माल्य रस्त्यावर किंवा पाण्यात न टाकता महापालिकेने ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकावे. सिंगल-युझ प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा.

*ध्वनिप्रदूषणावर मर्यादा*: डीजे व कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाऐवजी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून आवाजाची मर्यादा राखावी.

*सामाजिक उपक्रमांवर भर*: मंडळांनी केवळ देखाव्यांवर भर न देता रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, वृक्षारोपण आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी.

*शांतता व सुरक्षितता*: विसर्जन मिरवणुका व उत्सवादरम्यान रहदारीला अडथळा होणार नाही याची खबरदारी घेत पोलीस आणि पालिका प्रशासनाला सहकार्य करावे.

“गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण नसून आपल्या संस्कृतीचे आणि एकोप्याचे प्रतीक आहे. आपल्या बाप्पाचे स्वागत करताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. जळगाव शहराला स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक शहरवासीयाने जबाबदार नागरिक म्हणून हातभार लावावा.”

— दीपमाला मनोज काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button