Other

धक्कादायक : जळगावच्या टॉवर चौकात ‘द बर्निंग कार’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील शास्त्री टॉवर चौकात मंगळवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या चारचाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांतच चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली.

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या सुमारास शास्त्री टॉवर चौकातून एक पांढऱ्या रंगाची इंडिका कार एमएच १९ बीयू ७५६२ जात असताना अचानक इंजिनमधून धूर निघू लागला. परिस्थितीची गंभीरता ओळखून चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. चालकासह प्रवाशांनी वेळ न दवडता कारमधून बाहेर पडत जीव वाचवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

दरम्यान, काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि संपूर्ण कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवर पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे चौकातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्परतेने कारवाई करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांच्या वेगवान प्रतिसादामुळे आग आणखी पसरण्यापासून रोखण्यात यश आले.

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button