आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप


आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ
मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप
जळगाव | प्रतिनिधी
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देऊन सामाजिक सलोखा, समता आणि सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेअंतर्गत सन २०२६-२७ मध्ये प्राप्त प्रस्तावांवर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातून एकूण २०८ प्रस्ताव प्राप्त झाले असून, चालू आर्थिक वर्षासाठी उपलब्ध तरतुदीनुसार ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
प्राप्त प्रस्तावांपैकी पात्र ठरलेल्या ११८ लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात अनुदानाचे वाटप करण्यात आले.
यावेळी करिश्मा नायर यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रभारी समाजकल्याण अधिकारी भाऊसाहेब अकलाडे उपस्थित होते.
आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन मिळावे आणि समाजातील विविध घटकांमध्ये सामाजिक समता व एकात्मतेची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ पारदर्शक व नियमानुसार मिळावा, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.







