DetectionOther

परिविक्षाधिन डीवायएसपींच्या टीमची धडक कारवाई : गावठी दारू विक्रेते, सट्टा पेढी चालकांना दणका

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर आणि एम.आय.डी.सी. परिसरात अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. जळगाव भागचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर आणि त्यांच्या विशेष पथकाने ९ जून रोजी विविध ठिकाणी धडक छापे टाकले. या धडक कारवाईत गावठी हातभट्टी दारू विक्रेते आणि सट्टा मटका चालवणाऱ्या एकूण ८ संशयीत आरोपींना रंगेहात अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून रोकड आणि दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल आवेश शेख, सचिन सुरेश साळुंखे आणि अमोल अशोक ठाकूर यांच्या पथकाला जळगाव शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एम.आय.डी.सी. आणि जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना व पंचांना सोबत घेऊन एकाच दिवशी पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले.

आर.एल.चौफुलीला ३० लीटर दारू जप्त
पहिली कारवाई एम.आय.डी.सी. हद्दीतील आर. एल. चौफुली जवळील सर्विस रोडच्या बाजूला करण्यात आली. येथे एका पत्र्याच्या घराच्या आडोश्याला प्लास्टिक कॅनमधून अवैध गावठी हातभट्टी दारू विकणाऱ्या विशाल पुनमचंद राठोड (वय २०, रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला पोलिसांनी रंगेहात पकडले. त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीची ३० लीटर तयार गावठी दारू जप्त करण्यात आली. या दारूचा नमुना सी.ए. टेस्टसाठी काढून उर्वरित दारू जागीच नष्ट करण्यात आली असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेट्रोल पंपाजवळ सट्टा पेढीवर छापा
दुसरी कारवाई एम.आय.डी.सी. हद्दीतच पुष्पा पेट्रोल पंपाजवळील सर्विस रोडला करण्यात आली. येथे एका झाडाच्या आडोश्याला ‘टाईम बाजार’ नावाचा मटका सट्टा चालवणाऱ्या हनिस सैय्यद नवाज (वय ५१, रा. बळीराम पेठ, जळगाव) आणि रवींद्र गंभीर पाटील (वय ५६, रा. मोहाडी फाईल, जळगाव) या दोघांना पोलिसांनी अचानक छापा टाकून पकडले. त्यांच्या अंगझडतीतून ७,०८० रुपये रोख, सट्ट्याचे आकडे लिहिलेले स्लिप बुक आणि पेन जप्त करण्यात आले.

टाईम बाजार सट्टा पेढी उध्वस्त
तिसरी कारवाई देखील आर. एल. चौफुली परिसरात एका झाडाच्या आडोश्याला करण्यात आली. येथे ‘टाईम बाजार’ मटका सट्ट्याचे आकडे लिहून घेणारे मदानानंद प्रल्हाद शिंदे (वय ३४, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), शुभम दीपक जाधव (वय २७, रा. साई नगर, कुसुंबा) आणि कैलास शांताराम खेळवण (वय ४७, रा. अयोध्या नगर, जळगाव) या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सट्ट्याचे साहित्य आणि एकूण ३,४९० रुपये रोख जप्त करण्यात आले. दोन्ही मटका प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र जुगारबंदी अधिनियम कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गावठी दारू विकणारा जाळ्यात
चौथी कारवाई पुष्पा पेट्रोल पंपाजवळ करून पोलिसांनी सुरेश भीमराव सपकाळे (वय ५५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) याला गावठी हातभट्टी दारू विकताना पकडले. त्याच्याकडून ३,००० रुपये किमतीची ३० लीटर दारू जप्त करून ती जागीच नष्ट करण्यात आली. त्याच्याविरुद्धही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सट्टा खेळवणाऱ्या दोघांना पकडले
पाचवी कारवाई जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॉम्बे रेल्वे गेटसमोरील पुलाच्या खाली करण्यात आली. येथे स्वतःच्या फायद्यासाठी ‘मिलन डे ओपन’ नावाचा सट्टा जुगार खेळणारे आणि खेळवणारे आरोपी घनश्याम राजाराम पाटील (वय ४१) व मुकेश भिका मराठे (वय ४४, दोन्ही रा. खंडेराव नगर, जळगाव) यांना पोलिसांनी रंगेहात अटक केली. त्यांच्या ताब्यातून ९,४७० रुपयांची रोकड आणि सट्टा जुगाराचे पावती बुक जप्त करण्यात आले.

पथकात यांचा होता समावेश
या संपूर्ण मोहिमेत पोलिसांनी एकूण ८ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण २०,०४० रुपयांची रोकड, ६,००० रुपयांची गावठी दारू आणि सट्ट्याचे साहित्य जप्त केले आहे. संपूर्ण धडक कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या आदेशाने प्रो. डीवायएसपी प्रशांत दरेकर, पोकॉ आवेश शेख, सचिन साळुंखे, अमोल ठाकूर, किरण वानखेडे, तुषार पाटील तसेच एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे पोहेकॉ संजीव मोरे, रामदास कुंभार आणि अमोल पाटील यांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पूर्ण केली. या कारवाईमुळे जळगाव शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button