डाक जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांसाठी विमा प्रतिनिधी भरती; 2 जुलै रोजी भुसावळ येथे थेट मुलाखत

डाक जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांसाठी विमा प्रतिनिधी भरती; 2 जुलै रोजी भुसावळ येथे थेट मुलाखत
जळगाव: भारतीय डाक विभागामार्फत डाक जीवन विमा (PLI) तसेच ग्रामीण टपाल जीवन विमा (RPLI) योजनांच्या विक्रीसाठी विमा प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्या कार्यालयात थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग, भुसावळ येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्जासोबत आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट साइज फोटो तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.
या पदासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक असून किमान दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. तसेच विमा पॉलिसी विक्रीचा अनुभव, मार्केटिंग कौशल्य आणि स्थानिक परिसराची माहिती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे पुरुष व महिला, माजी विमा प्रतिनिधी, विमा सल्लागार, अंगणवाडी सेविका, बचत गटातील महिला, माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य तसेच स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी यांनाही अर्ज करता येणार आहे.
विमा प्रतिनिधींच्या निवडीबाबत अंतिम निर्णयाचे सर्व अधिकार अधीक्षक डाकघर, भुसावळ विभाग यांच्याकडे राखीव राहतील. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.






