Crime

इस्लामपुरा परिसरात शनिपेठ पोलिसांचा गोमांस तस्करांवर सर्जिकल स्ट्राईक!

५५ किलो गोमांसासह १९ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त : गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मध्यरात्री कारवाई; २४ वर्षीय तरुणाला बेड्या

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील प्रतिबंधित गोमांस विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी आता धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. इस्लामपुरा परिसरात प्रतिबंधित गोमांस विक्रीसाठी आणल्याची गोपनीय माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तब्बल ५५ किलो गोमांसासह एकूण १९ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका २४ वर्षीय तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध गोमांस विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

गुप्त माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित गोमांस विक्री, वाहतूक तसेच अवैध गोवंश वाहतुकीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना गोपनीय माहिती संकलित करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदारांना या अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत इस्लामपुरा परिसरातील मदिना मशीदजवळ प्रतिबंधित गोमांस विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. माहितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पथकाला रवाना केले.

५५ किलो गोमांसासह साहित्य जप्त

पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता संशयित तरुण गोमांस विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव कुरेशी सज्जाद खान युसुफ, वय २४ वर्षे, रा. घर नं. २१, इस्लामपुरा, जळगाव असे सांगितले.

पोलिसांनी त्याच्याकडून गोमांस व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले. यात ५५ किलो गोमांस (११ हजार रुपये), चार लोखंडी सुरी, वजनकाटा, जुना फ्रीज, लोखंडी लाकडी दांडा असलेली कु-हाड, तीन मस्कुल्या, दोन मापे, एक माप आणि इतर साहित्याचा समावेश आहे. या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत १९ हजार ७५० रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियमांतर्गत गुन्हा

या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे गुरनं. २५२/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ५ (अ), ५ (ब), ५ (क), ८ व ९ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलीस करीत आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

या पथकात महिला पोलीस उपनिरीक्षक पूजा पांढरे, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडेकर, पोलीस अंमलदार याकूब पठाण, पोलीस अंमलदार विकास राठोड, पोलीस अंमलदार विजय खैरनार, पोलीस अंमलदार अनिल सांखळे, शुभ्रकांत पाटील, रविंद्र इंगळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल बाजारी, पराग दुसाने, गजानन वाघ, निलेश घुगे, नवनीत चौधरी व सतीश भारके यांनी सहभाग घेतला.

गुप्त माहितीचे अचूक संकलन, तत्पर निर्णय आणि प्रत्यक्ष घटनास्थळी धडक देत केलेली कारवाई यामुळे शनिपेठ पोलिसांनी अवैध गोमांस विक्रीविरोधातील लढाईत ठोस कामगिरी नोंदवली आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दाखविलेली ही तत्परता निश्चितच कौतुकास्पद असून अशा कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे.

 

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button