
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिका शाळांमधील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीबाबत नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. शहरातील काही मनपा शाळांमध्ये सलग तीन दिवस नियमित पद्धतीऐवजी पर्यायी स्वरूपात खाद्यपदार्थांचे वितरण करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, या निर्णयामागील कारणे आणि प्रक्रिया याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.
माहितीनुसार, शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शालेय पोषण आहार बचत गटांच्या माध्यमातून तयार करून विद्यार्थ्यांना वितरित केला जातो. मात्र काही शाळांमध्ये तीन दिवसांसाठी वेगळ्या पद्धतीने खाद्यपदार्थ पुरविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या बदलासाठी अधिकृत परवानगी होती का, तसेच निर्णय कोणाच्या निर्देशानुसार घेण्यात आला, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
शिवाजीनगर, बळीराम पेठ परिसर, हिंदी शाळा, कंवरनगर, सिंधी कॉलनी, आदित्य चौक, मेहरूण परिसर, एमआयडीसी गृहकुल सोसायटी, पोलीस लाईन आणि खेडी येथील काही शाळांमध्ये हा प्रकार घडल्याची चर्चा आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पोषणाशी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीबाबत पालक आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कालावधीत वितरित करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची आणि सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित योजनांमध्ये पारदर्शकता आणि नियमांचे पालन होणे आवश्यक असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या विषयाकडे माध्यमांचे लक्ष वेधल्यानंतर चौथ्या दिवसापासून पुन्हा नियमित पद्धतीने बचत गटांकडून पोषण आहार तयार करून देण्यास सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे सुरुवातीच्या तीन दिवसांतील व्यवस्थेचा उद्देश आणि त्यामागील निर्णयप्रक्रिया याबाबत अधिकृत खुलासा करण्याची मागणी होत आहे.
महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचे संकेत दिले आहेत. चौकशी अहवालानंतर संबंधित बाबी स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित या विषयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





