जळगावात पोलिसांचा छापा; ३० किलो गोमांस, ४ कोयते, २ कुऱ्हाडीसह एकाला अटक
शनिपेठ पोलिसांची कारवाई , एकविरुद्ध गुन्हा दाखल

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इस्लामपुरा भागातील कसाई गल्लीत असलेल्या एका दुकानावर शनिवारी (दि. २६) सकाळी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकून सुमारे ३० किलो गोमांस आणि मांस कापण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आजम शेख सलीम शेख (२४) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शनिपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इस्लामपुरा भागातील मदिना मशीद जवळ एका लाकडी पार्टीशनच्या दुकानात गोमांसाची बेकायदेशीर विक्री होत आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी सपोनि मन्सुरी यांनी पोलीस पथक आणि दोन पंचांना पाचारण केले. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळावरून मांस व हत्यारे जप्त
पोलीस पथकाने कसाई गल्लीतील संशयित दुकानाची झडती घेतली असता, जमिनीवर कापडात झाकून ठेवलेले लाल रंगाचे, उग्र वास येणारे सुमारे ३० किलो वजनाचे संशयित गोमांस आढळून आले. तसेच मांस कापण्याचे ४ कोयते, २ कुऱ्हाडी, मस्कुला आणि वजनकाटा असे एकूण ९,७०० रुपये किमतीचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नमुने जप्त
घटनेचे गांभीर्य ओळखून पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश अशोक चोपडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन मांसाची पाहणी केली आणि तपासणीसाठी सुमारे २०० ग्रॅम मांसाचे नमुने मिठासह हवाबंद डब्यात सील केले. हे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे (FSL) पाठवण्यात येणार आहेत.
शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल
पोलीस कॉन्स्टेबल निलेश वासुदेव घुगे (पोको/१५४६) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आजम शेख सलीम शेख (वय २४, रा. इस्लामपुरा, जळगाव) याच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (ब), ५(क), ९, आणि ९ (अ) प्रमाणे शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि साजिद मन्सुरी यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि रवींद्र गायकवाड, पोहेकॉ शशिकांत पाटील, सुभाष चव्हाण, पोकॉ संभाजी पाटील, गणेश ढाकणे आणि गजानन वाघ यांच्या पथकाने केली.






