
आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये नवागत विद्यार्थ्यांच्या इंडक्शन कार्यक्रमास प्रारंभ
गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक वाटचालीची विद्यार्थ्यांना ओळख; मान्यवरांचे मार्गदर्शन
जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित इंडक्शन कार्यक्रमास उत्साहात प्रारंभ झाला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शैक्षणिक वातावरण, संस्थेची कार्यपद्धती आणि आगामी शैक्षणिक वाटचालीची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाला डॉ. प्रशांत सोलंकी, डॉ. उल्हास पाटील आणि मेडिकल कॉलेजचे रजिस्ट्रार प्रमोद भिरूड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत सोलंकी यांनी गोदावरी फाउंडेशनच्या शैक्षणिक, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याची तसेच संस्थेच्या प्रेरणादायी वाटचालीची माहिती दिली. शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात संस्थेने केलेले कार्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमोद भिरूड यांनी नवीन शैक्षणिक सत्राचे स्वरूप स्पष्ट करताना अभ्यासाचे योग्य नियोजन, प्रभावी अध्ययन पद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि शैक्षणिक जीवनात यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि इतर उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष केंद्रित न करता व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला नवप्रवेशित विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवागत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन जीवनातील संकोच दूर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, संस्थेच्या परंपरा व मूल्यांची ओळख करून देणे आणि त्यांच्या उज्ज्वल शैक्षणिक भवितव्याचा पाया घालणे, हा या इंडक्शन कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.







