OtherSocial

कठोर पण संवेदनशील नेतृत्व एसपी डॉ.महेश्वर रेड्डी यांना निरोप; श्रीकांत धिवरे यांच्याकडून नवी दिशा अपेक्षित

जळगाव जिल्ह्यात एकत्र कार्य करूया : श्रीकांत धिवरे यांचे जनतेला आवाहन

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीस दलात नेतृत्व बदलाच्या पार्श्वभूमीवर मावळते पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना भावपूर्ण निरोप देत नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी केलेल्या कामगिरीचा गौरव करत नव्या नेतृत्वाकडूनही प्रभावी आणि जनसहभागातून कामकाजाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांना निरोप आणि नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा स्वागत सोहळा दि.२२ रोजी नियोजन भवनात पार पडला. प्रसंगी व्यासपीठावर जिल्हाधिकारी रोहन घुगे, मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, नूतन अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे म्हणाले की, जिल्ह्यात साहेबांची २६ महिन्यांची कारकीर्द सर्वांनी पाहिली आहे. त्यात त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. सीडीडब्ल्यू ऍपमध्ये १२ हजार गुन्हेगारांची माहिती साठवली. इ बिट सिस्टीम राबवली. नागरिकांना घरबसल्या तक्रार करता यावी यासाठी क्यूआर कोड देण्यात आला. एकता चषकाचे आयोजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या १०० दिवस कलमी कार्यक्रमात राज्यात जळगावने तृतीय क्रमांक पटकावला. पोलीस अधीक्षक कार्यालय, ठाणे अंमलदार कक्ष, पोलीस हॉल, व्यायाम शाळा आणि जलतरण तलाव दुरुस्ती यासारख्या अनेक महत्वाच्या सुधारणा त्यांनी केल्या, असल्याचे गणापुरे यांनी सांगितले. नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आजवर २१ वर्ष सेवा बजावली आहे. त्यांनी गडचिरोली चांदूरबाजार येथून सुरुवात केली. धुळे पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी उत्तम काम केले. मॅरेथॉन स्पर्धा राबवली. जळगाव जिल्ह्यात देखील असेच कार्य सुरू राहणार असल्याच्या शुभेच्छा गणापुरे यांनी दिल्या.

मान्यवरांनी सांगितले अनुभव आणि व्यक्त केली अपेक्षा
प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील मान्यवर जळगावचे माजी उपनगराध्यक्ष करीम सालार, हरिश्चंद्र सोनवणे, कानळदा सरपंच पुंडलीक सपकाळे, सामाजिक कार्यकर्ते अयाज अली, इंडियन रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, पत्रकार किशोर पाटील, पोलीस कर्मचारी रतन गिते, सुनील दामोदर, कार्यालयीन कर्मचारी सुरेश ठाकूर, मुकेश सोनवणे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे, कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अमित माळी यांनी केले. आभार प्रदर्शन एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड यांनी केले.

..म्हणून अधिकाऱ्यांना काम करताना मोकळीक मिळाली : गावीत
अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत म्हणाले की, जळगाव जिल्हा संवेदनशील असून याठिकाणी काम करताना अनेक अडचणी येतात. कामाची कसोटी लागते मात्र त्या सर्वांना सामोरे जावून पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल असे कार्य पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्याचे नागरिक देखील समजूतदार असून ते नेहमी सहकार्य करतात. अनेक प्रसंग होते त्यात प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांनी सांभाळून घेतले. वरिष्ठ पातळीवर त्यांनी सांभाळून घेतले म्हणून खालील अधिकाऱ्यांना काम करताना मोकळीक मिळाली. कामातील पारदर्शकता, धाडस, संवेदनशीलता, मानव संसाधन आणि निर्णय क्षमता याचा मोठा प्रभाव कामकाजात राहीला. डॉ.रेड्डी सरांच्या पत्नी ऐश्वर्या यांनी महिला अंमलदार आणि पोलीस कुटुंबासाठी अनेक उपक्रम राबवले. नूतन अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या नेतृत्वात जिल्हा पोलीस दल चांगली वाटचाल करेल असे गावीत यांनी सांगितले.

..तेव्हा तुमची आठवण येईल : नेरकर
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर म्हणाल्या की, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी सर आणि मी ३ दिवसांच्या अंतराने जिल्ह्यात हजर झालो. २ वर्षाच्या काळात सर्व काळ कसा गेला ते कळलेच नाही. सेनापती खंबीर असेल तर कोणताही अनुचित प्रकार मोठा असतो असे वाटत नाही. तुम्ही इतके संयमी आणि चांगले आहेत की त्यामुळे माझे अधिकारी मला खडूस म्हणतात. कायदा व सुव्यवस्थेचे अनेक प्रसंग आले मात्र डॉ.रेड्डी यांनी आधार देत सर्व योग्य पद्धतीने हाताळले. आयुष्यात जेव्हाही डोके शांत ठेवून निर्णय घ्यावा लागेल, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पुढे येऊन सामोरे जावे लागेल तेव्हा तुमची आठवण येईल, असे नेरकर यांनी डॉ.रेड्डी यांच्याबद्दल म्हटले. जळगावचे वातावरण तसे हॉटच आहे. सर्व टीम तयार झाली आहे. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, असे कविता नेरकर यांनी नूतन अधीक्षक धिवरे यांना म्हणाल्या.

आपण जिल्ह्यात एकत्र कार्य करूया : नूतन अधीक्षक
नूतन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी, मला पोलीस दलात २२ वर्ष झाले. मी मुळचा पुणे जिल्ह्यातील आहे. कोणताही गुन्हा असो किंवा गुन्हेगारी असो पोलीस एकटे काही करू शकत नाही जनतेच्या सहकार्याची गरज भासते. आपण जिल्ह्यात एकत्र कार्य करूया असे आवाहन त्यांनी केले.

आज सभागृह खच्चून भरले : जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी रोहन घुगे म्हणाले की, सभागृहातील शेवटची खुर्ची क्वचित भरलेली असते आज ती चेअर रिकामी नाही त्यातच सरांचे सर्व कार्य कर्तुत्व आले. कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी डॉ.महेश्वर रेड्डी यांनी घेतली होती म्हणून इतर अधिकाऱ्यांवर त्याचा भार आला नाही. अनेक निवडणूका, बंदोबस्त त्यांनी हाताळले. डीपीसीमधून करायच्या कामासाठी त्यांचे चांगले लक्ष होते. जळगाव जिल्ह्यात खूप चांगले काम त्यांनी केले. भविष्यात ते कुठेही काम करतील त्याठिकाणी ते उत्कृष्ट कामगिरी करतील. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळ्यात सुरू केलेल्या चांगल्या कामांचा उपक्रम जळगावात देखील सुरू राहील अशी अपेक्षा रोहन घुगे यांनी व्यक्त केली.

२ वर्ष केलेल्या कामावर मी समाधानी : डॉ.रेड्डी
मावळते पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी निरोप देताना म्हणाले की, मुंबईत काम केल्यानंतर इतर काम करण्याची इच्छा होत नाही मात्र आपण एमबीबीएस सोडून ज्यासाठी आयपीएस झालो ते लक्षात घेऊन मी शासनाला विनंती करून जळगावात पोलीस अधीक्षक झालो. पदभार स्वीकारताच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. ते आटोपले नाही तोच निवडणुका आल्या, ते संपले तोच सणोत्सव आले. चमकोगिरी करण्याचे कार्य मी स्वतः कधीही केले नाही नेहमी माझ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून चांगले कार्य करून घेतले. आपण पोलीस दलासाठी काही कमावू शकलो नाही तरी काही गमावू देखील नाही असे माझे तत्व होते. माझ्या दृष्टिकोननुसार चांगले कार्य करणाऱ्यांना मी सांभाळून घेतले, त्यांना प्रेरणा देत आणखी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत कार्य करणारे अधिकारी देखील चांगले होते काहीही सांगितले तर ते करून घेत होते. मी पाहिलेल्या टीमपैकी सर्वात चांगली टीम इथे पाहायला मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दोन वेळा पाहणी दौरा झाला मात्र त्यात काहीही त्रुटी आढळून आल्या नाही हे आमच्या टीमचे कार्य आहे. मी एक-एक पोस्टिंगला एक-एक खेळ शिकलो. आनंदी अधिकारी, कर्मचारी असले तर ते अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतात असे माझे मत होते त्यानुसार मी काम केले. मला २ वर्ष केलेल्या कामावर मी समाधानी आहे, असे डॉ.रेड्डी यांनी सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button