Social

रस्ते बांधकामात वृक्षसंवर्धनाची काळजी घ्या; पृथ्वीराज सोनवणे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

रस्ते बांधकामात वृक्षसंवर्धनाची काळजी घ्या; पृथ्वीराज सोनवणे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन

वृक्षांच्या अवतीभवती काँक्रीटीकरण टाळण्याची मागणी; नवीन रस्त्यांमध्ये वृक्षारोपणासाठी जागा राखीव ठेवण्याचा आग्रह

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांदरम्यान रस्त्यालगतच्या वृक्षांच्या खोडालगत होत असलेल्या काँक्रीटीकरणामुळे वृक्षांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी जळगाव महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. विद्यमान वृक्षांचे संरक्षण तसेच भविष्यातील रस्ते बांधकामात वृक्षसंवर्धनाची योग्य तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे सुरू असून अनेक ठिकाणी झाडांच्या खोडालगतच काँक्रीटीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी मुळांपर्यंत पोहोचत नाही, मातीतील हवेचा प्रवाह बंद होतो आणि झाडांची नैसर्गिक वाढ खुंटते. परिणामी झाडे कमकुवत होऊन पावसाळ्यात किंवा वादळी वाऱ्यात कोसळण्याचा धोका वाढत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

उच्च न्यायालयानेही वृक्षांच्या संरक्षणासाठी झाडांच्या अवतीभवती किमान एक मीटरचा मोकळा मातीचा परीघ ठेवण्याचे निर्देश दिले असल्याचा उल्लेख करत, महानगरपालिकेने या तत्त्वाचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच भविष्यात तयार होणाऱ्या नवीन रस्त्यांमध्ये सुमारे १५ ते २० फूट अंतराने वृक्षारोपणासाठी कायमस्वरूपी जागा व खड्ड्यांची तरतूद करण्याची सूचना करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात रस्ते पुन्हा खोदण्याची गरज भासणार नाही, रस्त्यांचे आयुष्य वाढेल, उष्णतेत घट होईल आणि शहर अधिक हिरवेगार बनेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

जळगाव महानगरपालिका हद्दीत सध्या सुमारे ४ लाख १७ हजार ५९७ वृक्ष असून शहराची लोकसंख्या जवळपास ७ लाख आहे. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षांचे संवर्धन आणि शंभर टक्के संगोपनही तितकेच आवश्यक असल्याचे पृथ्वीराज सोनवणे यांनी अधोरेखित केले.

निवेदनाद्वारे रस्त्यालगतच्या विद्यमान वृक्षांच्या खोडालगतचे काँक्रीटीकरण तातडीने थांबविणे, प्रत्येक वृक्षाभोवती किमान एक मीटरचा मोकळा मातीचा परीघ ठेवण्याचे अभियंते व ठेकेदारांना सक्त निर्देश देणे, नवीन रस्त्यांमध्ये नियोजनबद्ध वृक्षारोपणासाठी जागा राखीव ठेवणे तसेच शहरात व्यापक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्याची मागणी करण्यात आली आहे.

“आज योग्य नियोजन करून वृक्षांचे संरक्षण केले, तरच भविष्यात जळगाव शहर ‘स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार शहर’ म्हणून ओळखले जाईल,” असेही पृथ्वीराज सोनवणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button