Other

मजूर देण्याचे आमिष, ठेकेदाराची लूट; तिघांना २४ तासांत अटक

मजूर देण्याचे आमिष, ठेकेदाराची लूट; तिघांना २४ तासांत अटक

रावेर पोलिसांची धडक कारवाई

रावेर, प्रतिनिधी : मजूर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवत बांधकाम ठेकेदाराला निर्जनस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम आणि ऑनलाइन व्यवहारातून पैसे लुटणाऱ्या तिघांना रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून आणखी काही लुटीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख जाबीर शेख अमान, वय ४१, व्यवसाय बांधकाम ठेकेदार, रा. फारुकी आझम कॉलनी, विनावल, ता. रावेर, यांना बांधकामासाठी मजुरांची आवश्यकता असल्याने ते विविध ठिकाणी फिरत असतात. याचाच फायदा घेत आरोपी मुस्तकीम याने त्यांना फोन करून दोन मजूर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार ४ जुलै रोजी फिर्यादींना विवरा येथे बोलावून मजूर अजंदा येथे असल्याचे सांगत अजंदा रेल्वे पुलाजवळ नेण्यात आले.

तेथे पांढऱ्या रंगाच्या अॅक्टिव्हाजवळ उभ्या असलेल्या दोन युवकांकडे मजूर असल्याचे सांगून फिर्यादींना शेताच्या आत नेण्यात आले. त्यानंतर एका आरोपीने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून पैशांची मागणी केली. फिर्यादींकडे असलेले ५०० रुपये आरोपींनी घेतले. त्यानंतर त्यांचा मोबाईल हिसकावून फोन-पेचा पिन जबरदस्तीने विचारून विविध व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून आठ हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळते करण्यात आले. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी अजंदा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, रात्रीची वेळ असल्याने आरोपींची ओळख पटत नव्हती. दरम्यान, पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांना आरोपींनी वापरलेल्या वाहनाबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवत मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी शेख मुस्तकीम शेख अकील, वय २२, रा. फतेहनगर, रावेर, शेख मोईन शेख नईम, वय १९, रा. खिर्डी रोड, विवरा आणि फैजल बेग हितायत बेग, वय १९, रा. शंकर प्लॉट, रावेर, यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच-१९-ईडी-५५८० तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शेख मोईन शेख नईम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या लुटीचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या टोळीने आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास सुरू आहे.

न्यायालयाने तिन्ही आरोपींना ९ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील तसेच गुन्हे शोध पथकातील समाधान ठाकूर, विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण आणि सुकेश तडवी यांनी केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button