
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । यावल येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले अत्यंत मनमिळावू कर्मचारी भरत विठ्ठल कोळी (वय ३८) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावल-किनगाव रस्त्यावरील हॉटेल मनमंदिराजवळ एका भरधाव क्रूझरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोळी यांची सोमवारी जळगाव येथे उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ९ एप्रिल रोजी रात्री भरत कोळी हे आपल्या दुचाकीने क्र. MH.19.CG.2813 यावल येथून किनगावमार्गे आपल्या राहत्या गावी विदगाव येथे जात होते. हॉटेल मनमंदिराजवळून जात असताना मागून आलेल्या भरधाव क्रूझरने क्र. MH.29.BC.5487 त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत कोळी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची मृत्यूशी झुंज संपली.
या अपघात प्रकरणी प्रवीण कोळी यांच्या फिर्यादीवरून क्रूझर चालक दीपक प्रकाश सपकाळे (रा.आडगाव) याच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाई केली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करत आहेत.
भरत कोळी यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी विदगाव (ता. यावल) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, जळगाव डीवायएसपी नितीन गणापुरे, फैजपूर डीवायएसपी अनिल बडगुजर, यावल निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि जळगाव तालुका निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा मुख्यालयातील मानवंदना पथकाने हवेत रायफलच्या फैरी झाडून त्यांना अखेरची सलामी दिली.
आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक आणि स्वभावाने अत्यंत मृदू असलेल्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देताना उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.





