Other

श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

श्री मंगळग्रह मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

विविध योगप्रकारांचा सराव; आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश

अमळनेर | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवारी (दि. २१ जून) विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

योग शिबिराची सुरुवात योग प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम आणि खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा आणि श्वसनक्रियांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सहभागी नागरिकांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती यांसह विविध योगप्रकारांचा सराव केला.

यावेळी मार्गदर्शन करताना दिलीप बहिरम यांनी योगाचे महत्त्व विशद केले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक तणाव कमी होतो आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.

खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी योगाच्या आरोग्यविषयक फायद्यांची माहिती देताना सांगितले की, नियमित योगामुळे रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे बळकट होतात, लठ्ठपणावर नियंत्रण मिळविता येते तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. ध्यान आणि प्राणायामामुळे मानसिक शांतता लाभते व सकारात्मक विचारसरणी विकसित होते, असेही त्यांनी सांगितले.

शिबिरात उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यास हातभार लागेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button