OtherSocial

ब्रेकिंग : पोलीस निरीक्षक मधुकर साळवे कंट्रोल जमा, गोरक्षकांची तक्रार भोवली, पवन देसले नवे प्रभारी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । चोपडा शहरातील अलीकडील घडामोडींमुळे पोलीस प्रशासनात तातडीने बदल करण्यात आले असून, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वाहतूक शाखेचे निरीक्षक पवन देसले यांची नियुक्ती करण्यात आली असून, यासंदर्भातील आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जारी केले आहेत.

चोपडा परिसरात गो-तस्करीच्या संशयावरून झालेल्या एका घटनेनंतर वातावरण तापले होते. या प्रकरणात काही गोरक्षकांवर हल्ला झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर संबंधितांनी तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याची भावना व्यक्त करत काही संघटनांनी नाराजी दर्शवली.

रोहित निकम यांनी केली होती तक्रार
या पार्श्वभूमीवर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिल्याचे सांगितले जाते.

मोर्चादरम्यान आंदोलकांशी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा संवाद घडवून आणण्यात आला होता. यावेळी प्रकरणाची चौकशी निश्चित कालावधीत पूर्ण करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत बदल्यांचे आदेश जारी केले.

पोलीस ठाणे प्रशासनात फेरबदल
दरम्यान, पोलीस दलात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बदल्यांची मालिका सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसांत दोन निरीक्षकांच्या बदल्यांमुळे पोलीस दलात विविध चर्चांना उधाण आले आहे. याशिवाय, वाहतूक शाखेतही फेरबदल करण्यात आला असून, पवन देसले यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी संजय गायकवाड यांच्यावर शहर वाहतुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button