जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; पोलिसांकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती
ई-मेलमुळे खळबळ; बीडीडीएस पथकाकाकडून तपासणी, संशयास्पद वस्तू आढळली नाही

जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; पोलिसांकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती
ई-मेलमुळे खळबळ; बीडीडीएस पथकाकाकडून तपासणी, संशयास्पद वस्तू आढळली नाही
जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाला ई-मेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी मिळाल्याने सोमवारी न्यायालयीन वर्तुळात एकच खळबळ उडाली. धमकीचा ई-मेल प्राप्त होताच पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली करत संपूर्ण न्यायालय परिसराची तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) न्यायालयाची इमारत आणि परिसराची घातपातविरोधी तपासणी केली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आली नाही.
धमकीच्या ई-मेलने सुरक्षा यंत्रणा सतर्क
न्यायदानाचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयालाच बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तातडीने खबरदारी घेत बीडीडीएस पथकाला पाचारण केले. पथकाने न्यायालयाच्या इमारतीसह परिसरातील विविध ठिकाणांची बारकाईने तपासणी केली.
संशयास्पद वस्तू आढळली नाही
धमकीच्या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरातील संभाव्य संवेदनशील ठिकाणांचीही तपासणी करण्यात आली. घातपाताची शक्यता लक्षात घेऊन पथकाने आवश्यक ती खबरदारी घेतली. मात्र, या तपासणीदरम्यान स्फोटक साहित्य, संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे पोलिसांसह न्यायालयीन वर्तुळाला तूर्तास दिलासा मिळाला आहे.
पोलीस अधीक्षकांकडून माहिती
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, जिल्हा व सत्र न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीडीडीएस पथकाकडून न्यायालयाची इमारत आणि संपूर्ण परिसराची घातपातविरोधी तपासणी करण्यात आली. या तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आलेली नाही.






