पितृपक्षानिमित्त सामूहिक गोसेवा व गोपूजन उत्साहात


पितृपक्षानिमित्त सामूहिक गोसेवा व गोपूजन उत्साहात
संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम; समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव : पितृपक्षाचे औचित्य साधून पितरांना मोक्षप्राप्ती, विश्वकल्याण, धर्मजागृती व गोसंरक्षणाचा संदेश देण्यासाठी संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या वतीने सकल सोनार समाजाच्या सहभागातून सामूहिक गोसेवा, गोपूजन व गोग्रास सवामणी लापशी दान कार्यक्रम पांजरापोळ येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला.
संस्थेच्या वतीने गेल्या बारा वर्षांपासून हा उपक्रम निरंतर राबविण्यात येत आहे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्याबरोबरच गोसेवा, पर्यावरण संवर्धन आणि समाजात धार्मिक व सेवाभावी संस्कार रुजविण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात हनुमान चालीसा व शांती मंत्र पठणाने झाली. त्यानंतर विधिवत गोपूजन करून गोमातेची सामूहिक आरती करण्यात आली. यावेळी गोमातेस सवामणी लापशीचा गोग्रास अर्पण करून गोसेवेचा संकल्प करण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी श्रद्धेने गोसेवेत सहभाग घेतला.
याप्रसंगी सोनार समाज वंशवाळकर श्री. ललित महाराज अहिरराव, ‘गोसेवा एक अनुष्ठान चळवळ’ तसेच पृथ्वी बचाव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्य करणारे श्री. विजयजी काबरा, विश्वकर्मा महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री. संजय विसपुते तसेच कवी श्री. उत्तमराव नेरकर यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन संस्थेचे सचिव जगदीश देवरे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची माहिती देत गोसेवा ही केवळ धार्मिक परंपरा नसून सामाजिक व पर्यावरणीय दायित्व असल्याचे सांगितले.
यावेळी ललित महाराज अहिरराव, विजयजी काबरा, रमेश वाघ, किरण पातोंडेकर , गोविंदराव वानखेडे, संजय विसपुते, विजय वानखेडे, जीवन सोनार, सुनील सोनार, राजेश बिरारी, यशवंत वडनेरे, गणेश वानखेडे, राजेंद्र रणधीर, शाम भामरे, बबलू मामा, शरद रणधीर, शरद भालेराव, विजय बागुल, रमेश विसपुते, उत्तमराव नेरकर, दीपाली बिरारी, रेखा बागुल, निर्मला देवरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम सोनार, प्रमोद सोनार,हर्षल बिरारी व निरज देवरे यांनी विशेष परिश्रम घेतले.







