Social

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले; अपघातात रोहित नेरकरचा दुर्दैवी मृत्यू

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नेरकर कुटुंबीयांना भेट देत सांत्वना

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावणारे विजय नेरकर यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. त्यांचा २४ वर्षीय मुलगा डॉ. रोहित विजय नेरकर याचा मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या रोहितच्या अकाली निधनाने नेरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रोहित नेरकर हा बडोदा, गुजरात येथे MBBSच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. अत्यंत मेहनती, हुशार आणि मनमिळाऊ स्वभावाचा रोहित आपल्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारातही सर्वांचा लाडका होता. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून डॉक्टर बनण्याचे त्याचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने NEET परीक्षेचीही मनापासून तयारी केली होता. भविष्यासाठी अनेक स्वप्ने आणि कुटुंबीयांच्या अपेक्षा घेऊन मेहनत करणाऱ्या रोहितचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर मोठे दुःख ओढवले आहे.

दि.२१ सप्टेंबर रोजी रात्री जेवणासाठी मोटारसायकलवरून बाहेर पडलेल्या रोहितचा एका पुलाजवळ अपघात झाला. या अपघातात त्याला प्राण गमवावे लागले. काही क्षणांतच एका होतकरू तरुणाचे आणि कुटुंबाच्या भविष्याचे स्वप्न काळाच्या पडद्याआड गेले.

रोहितच्या पश्चात त्याचे आई-वडील आणि बहीण असा परिवार आहे. त्याची बहीणही ठाणे येथे B.Techच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलांनी उच्च शिक्षण घेऊन आयुष्यात मोठे यश मिळवावे, अशी नेरकर कुटुंबाची स्वप्ने होती. मात्र रोहितच्या अकाली निधनाने या स्वप्नांवर दुःखाची काळी छाया पसरली आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिला आधार
या दुःखद प्रसंगी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. पोलीस दलातील सहकाऱ्याच्या कुटुंबावर आलेल्या या दुःखात पोलीस विभाग त्यांच्या पाठीशी असल्याचा आधार त्यांनी दिला.

तरुण वयात, डॉक्टर होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितचा असा अचानक झालेला अंत मन हेलावून टाकणारा आहे. त्याच्या निधनाने नेरकर कुटुंबीयांसह मित्र परिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button