Crime

चाळीसगावात १५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक 

चाळीसगावात १५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची फसवणूक 

९७ लाखांचा अपहार उघड

चाळीसगाव: महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या सचिव, मुख्याध्यापक आणि क्लार्क यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शासनाची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकूण १५ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगारातील तब्बल ९७ लाख रुपये अनधिकृतपणे कपात करून लाटण्यात आल्याचा आरोप असून, तिघांविरोधात चाळीसगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चाळीसगाव तालुका पंचायत समितीतील तालुका विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई (वय ५०, रा. उंटवाडी, तिळकेनगर, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, महात्मा फुले सामाजिक व शैक्षणिक विकास मंडळ संचलित जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ही शाळा मालेगाव रोड लगत आहे.

संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव), मुख्याध्यापक अभिजीत जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड, जयहिंद हायस्कूलजवळ, चाळीसगाव) आणि क्लर्क ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क, धुळे रोड, चाळीसगाव) यांनी संस्थेचे संपूर्ण आर्थिक कामकाज पाहत असताना हा गैरव्यवहार केला.

शिक्षकांना धमकी देऊन बेकायदेशीर कपात

या तिघांनी शिक्षकांना नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली, जबरदस्तीने संमतीपत्रांवर सह्या घेतल्या आणि काही कर्मचाऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या पगारातून २००६ ते डिसेंबर २०२४ पर्यंत बेकायदेशीररित्या कपात केली.

९७ लाखांचा अपहार

शासनाच्या अनुदानातून येणाऱ्या पगारातून कपात करून एकूण ९७,०१,१०० रुपये स्वतःच्या फायद्यासाठी वळते केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button