निपुण भारत उपक्रमाचा व्हिडिओ कॉलद्वारे आढावा

निपुण भारत उपक्रमाचा व्हिडिओ कॉलद्वारे आढावा
विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केले कौतुक
जळगाव, निपुण भारत अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या तासिकांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आज जिल्हा परिषद शाळा, डोंगर कठोरे येथील शिक्षक श्री. राहुल वाणी यांच्या वर्गाशी व्हिडिओ कॉलद्वारे थेट संवाद साधला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रत्येक विद्यार्थी कोणत्या अध्ययन स्तरावर आहे, याची माहिती घेतली. संबंधित स्तरानुसार विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अध्ययन प्रगतीची पडताळणी केली. तसेच कृती आराखड्यानुसार व त्या दिवसाच्या नियोजनानुसार कोणते अध्यापन करण्यात आले, याची माहिती शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडूनही जाणून घेतली.
स्तर ५ वरील विद्यार्थ्यांकडून २० पर्यंतच्या संख्यांचे वाचन करून घेतले तसेच त्या संख्यांची बिनहातच्याची बेरीज फळ्यावर करून घेत विद्यार्थ्यांच्या गणितीय कौशल्याची चाचपणी केली. त्यानंतर प्रगत स्तरातील एका विद्यार्थिनीला १०० पर्यंतच्या दोन अंकी संख्यांची हातच्याची बेरीज करण्यास सांगितले. विद्यार्थिनीने अचूक उत्तर दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तिचे विशेष कौतुक केले.
यानंतर स्तर ५ वरील एका विद्यार्थिनीला वाचन करण्यास सांगण्यात आले. विद्यार्थिनीचे वाचन ऐकल्यानंतर त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्याबाबत वर्गशिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. पुढे प्रगत गटातील एका विद्यार्थिनीला पुस्तकातील उतारा वाचण्यास सांगितले असता तिने जोडाक्षरयुक्त शब्द व वाक्यांचे अचूक व प्रभावी वाचन केले. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी तिचे अभिनंदन करत इतर विद्यार्थ्यांनीही तिचा आदर्श घ्यावा, असे सांगितले.
व्हिडिओ संवादाच्या शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी वर्गातील विद्यार्थ्यांची अध्ययन प्रगती, शिक्षकांचे नियोजन आणि निपुण भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिक वृद्धिंगत करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.






