Crime

मैत्रीचा विश्वासघात! अनैतिक संबंधातून मित्राचाच गळा आवळून खून

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात अनैतिक संबंधांच्या वादातून एका मजुराने आपल्या मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मयताला आधी दारू पाजून शेतात नेण्यात आले आणि त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली. खुनानंतर मृतदेह शेतात टाकून आरोपी फरार झाले होते. मात्र रावेर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही दिवसांत या खुनाचा उलगडा केला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 343/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा ९ जुलै रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ११ जुलै रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंत घडल्याचे निष्पन्न झाले असून १२ जुलै रोजी दुपारी २.४१ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.या प्रकरणात शेख सलमान शेख शब्बीर (वय २६, रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गणेश संजय घोरपडे (वय २७, रा.भोर, ता. रावेर) आणि मेघराज वसंत सांगळे (वय २९, रा. भोर, ता.रावेर) या दोघांना संशयीत आरोपी केले आहे.

अनैतिक संबंधातून निर्माण झाला खुनाचा कट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी गणेश घोरपडे याचे मयताच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर (ता. रावेर) येथे आरोपीला मयताच्या पत्नीसोबत गावकऱ्यांनी रंगेहात पकडले होते. त्यावेळी आरोपीला मारहाणही झाली होती. या घटनेचा राग आरोपीच्या मनात होता. त्यानंतर त्याने मयताला “माझे तुझ्या पत्नीवर प्रेम आहे, तू मध्ये आला तर तुला ठार मारेन,” अशी धमकी दिली होती. दरम्यान, या प्रकारानंतर मयताच्या पत्नीला तिच्या नातेवाईकांनी मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर जिल्ह्यातील आशीरगड येथे माहेरी पाठवले होते.

दारू पाजून शेतात नेले, गळा आवळून हत्या
९ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपी गणेश घोरपडे आणि मेघराज सांगळे यांनी मयताला दारू पाजली. त्यानंतर मोटारसायकलवरून त्याला नांदूरखेडा शिवार (ता. रावेर) येथे नेले. तेथे हाताने गळा आवळून त्याचा खून केला आणि मृतदेह घटनास्थळीच टाकून दोघेही पसार झाले.

पोलिसांची वेगवान कारवाई
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना रावेर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विविध तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. संशयीत आरोपी मेघराज सांगळे याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. तर मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा मध्य प्रदेशात पळून गेला होता. त्याचा शोध घेत पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या पथकाने सागवानी, तहसील जयशिनगर, जिल्हा सागर (मध्य प्रदेश) येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.

रावेर पोलिसांनी अल्पावधीत तपास पूर्ण करून अनैतिक संबंधातून घडलेल्या या खुनाचा उलगडा केल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button