Other

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा जि.प. शाळा व वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची अचानक भेट

जळगाव, : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी गुरुवार, दि. ६ ऑगस्ट रोजी पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान गोराडखेडा जिल्हा परिषद शाळा तसेच वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी शिक्षण व आरोग्य विभागाच्या कामकाजाचा आढावा घेत आवश्यक सूचना दिल्या.

दौऱ्याची सुरुवात पाचोरा पंचायत समिती येथे ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बैठकीने झाली. या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत घरकुलांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपूर्ण घरकुले, तसेच लाभार्थ्यांना पहिला व दुसरा हप्ता वितरित न झालेल्या प्रकरणांची तपशीलवार समीक्षा करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे व अपूर्ण घरकुले लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिले.

त्यानंतर त्यांनी गोराडखेडा जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अध्ययनाचा आढावा घेतला. निपुण चाचणीसंदर्भात विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेत त्यांच्या अध्ययन क्षमतेची पडताळणी केली. तसेच शाळेतील मध्यान्ह भोजनाची प्रत्यक्ष चव चाखून भोजनाच्या गुणवत्तेचीही पाहणी केली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी अधिक प्रभावी अध्यापन पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तसेच शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी पालकांशी सातत्याने संवाद साधून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच प्रवेशवाढीवरही विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर वरखेडी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन त्यांनी आरोग्य केंद्रातील स्वच्छतेची पाहणी केली. ओपीडी नोंदवही, औषध साठा, एक्सपायरी रजिस्टर यांची तपासणी करून उपलब्ध औषधसाठ्याची माहिती घेतली. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून जबाबदारीने काम करावे, तसेच प्राथमिक आरोग्य सुविधा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button