बिग ब्रेकिंग : जळगावातील व्यापाऱ्याचे ३ कोटींचे सोने चोरी, सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अमरावती शहरात धावत्या ट्रेनमधून तब्बल २.३० किलो सोन्याची चोरी होण्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना काल सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्टेशनवर घडली. या चोरीमुळे सराफा व्यावसायिकांमध्ये प्रचंड भय आणि अस्वस्थता पसरली असून, रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, सोने चोरी झालेला व्यापारी जळगावातील असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील सराफा व्यावसायिक किशोर वर्मा हे दिवाळीच्या निमित्ताने अमरावतीतील स्थानिक व्यावसायिकांना सोन्याचे दागिने आणि माल दाखवण्यासाठी आलेले होते. संपूर्ण दिवस अनेक व्यावसायिकांकडून ऑर्डर घेऊन ते सायंकाळी जळगावला परतण्यासाठी हावडा-मुंबई मेल ट्रेनमध्ये चढले. रेल्वे निघत असतानाच, त्यांच्या हातातील २३०० ग्रॅम सोन्याने भरलेली बॅग अज्ञात व्यक्तीने उचलून नेली.
आपल्या हातातील बॅग चोरी होताच किशोर वर्मा यांनी तात्काळ जीआरपी पोलिसांना सूचित केले. जीआरपीने स्टेशनच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. मात्र, अद्याप चोराचा किंवा चोरीच्या पद्धतीचा कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी अतिशय धाडसी आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली असावी, कारण धावत्या ट्रेनमध्ये अशी घटना घडणे दुर्मीळ आहे. चोराने गर्दीचा फायदा घेऊन किंवा काही युक्ती वापरून बॅग उचलली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सराफ बाजारात खळबळ
या घटनेच्या पार्श्वभूमीवर, जळगाव आणि अमरावतीतील सराफा बाजारात खळबळ उडाली आहे. दिवाळीचा हंगाम असल्याने व्यावसायिक मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी-विक्री करत असतात. अशा वेळी अशी चोरी होणे हे व्यावसायिकांसाठी धोकादायक ठरत आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, अतिरिक्त मनुष्यबळ आणि तांत्रिक साधनांचा वापर करून चोराचा शोध घेण्यात येत आहे.






