मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
दोन महिन्यांत ८,५५२ रुग्णांची तपासणी; ६८९ शस्त्रक्रिया यशस्वी
जळगाव, प्रतिनिधी : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या ह.भ.प. जगन्नाथ महाराज अंजाळेकर नेत्रालयातर्फे राबविण्यात येत असलेल्या मोतीबिंदूमुक्त यावल तालुका या विशेष अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकूण ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात येवून ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
१० जूनपासून सुरू झालेल्या या मोहिमेमुळे यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना त्यांच्या गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध झाली असून मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व रोखण्यासाठी प्रभावी पाऊल उचलले गेले आहे.जागतिक दृष्टिदान दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या या अभियानांतर्गत यावल तालुक्यातील विविध गावांमध्ये नेत्रतपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. शिबिरांमध्ये डोळ्यांच्या आजारांसह इतर विविध आजारांचीही तपासणी करण्यात येत असून आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडून उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन दिले जात आहे.अभियानाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत एकूण ८ हजार ५५२ रुग्णांची ओपीडी तपासणी करण्यात आली आहे. यापैकी २ हजार ९२२ रुग्णांना आयपीडीमध्ये दाखल करून उपचार देण्यात आले. तपासणीदरम्यान मोतीबिंदू व इतर नेत्रविकार निदर्शनास आलेल्या रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आतापर्यंत ३७९ मेजर आणि ३१० मायनर अशा एकूण ६८९ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.या अभियानाचा सर्वाधिक लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरजू व ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. गावोगावी जाऊन केलेल्या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांमध्ये मोतीबिंदूचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाले असून वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी प्राप्त झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येत आहे.या अभियानासाठी डॉ. एन. एस. आर्विकर व डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे. डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे हे डॉक्टर रुग्णसेवेसाठी कार्यरत आहेत.यावल तालुक्यातील प्रत्येक गरजू नागरिकापर्यंत नेत्रसेवा पोहोचवून मोतीबिंदूमुळे होणारे अंधत्व पूर्णतः रोखणे आणि मोतीबिंदूमुक्त यावल तालुका हे उद्दिष्ट साध्य करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू आहे. नागरिकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे ही मोहीम आगामी काळात आणखी व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.







