
रावेर–पुनखेडा–पातोंडी रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासा; आमदार अमोल जावळेंच्या प्रशासनाला सक्त सूचना
ग्रामस्थांच्या तक्रारींची गंभीर दखल; रस्त्याची जाडी, साहित्य व डांबरीकरणाची तांत्रिक तपासणी करण्याचे आदेश
रावेर | प्रतिनिधी
रावेर तालुक्यातील रावेर–पुनखेडा ते पातोंडी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार अमोल जावळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित रस्त्याच्या कामाची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासावी आणि कामात कोणतीही तडजोड होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सक्त सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
रावेर व मुक्ताईनगर तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे रस्त्याचे काम शासनाच्या निर्धारित तांत्रिक निकषांनुसार आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र, सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केल्याने आमदार जावळे यांनी प्रशासनाकडे याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमोल जावळे यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, जळगावचे कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करण्याच्या सूचना केल्या आहेत. सक्षम अधिकाऱ्यांमार्फत कामाची तांत्रिक तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
तपासणीदरम्यान रस्त्याच्या कामात वापरण्यात आलेले साहित्य, रस्त्याची जाडी, मजबुतीकरणाची प्रक्रिया, डांबरीकरण तसेच इतर तांत्रिक बाबी तपासण्यात याव्यात, असे आमदार जावळे यांनी स्पष्ट केले आहे. कामात त्रुटी किंवा गुणवत्तेची कमतरता आढळल्यास संबंधितांकडून आवश्यक ती पूर्तता करून घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
“जनतेच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. रस्त्याचे काम दर्जेदार आणि टिकाऊ झाले पाहिजे. विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका आमदार अमोल जावळे यांनी घेतली आहे.







