Social

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे; ४४५ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया

रावेर तालुक्यात मोतीबिंदू निर्मूलन अभियान अंतिम टप्प्यात

९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे; ४४५ यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया
जळगाव — डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया तर्फे रावेर तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून हे अभियान आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
११ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत रावेर तालुक्यातील तब्बल ९८ गावांमध्ये नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये आतापर्यंत ३०५४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून ६४८रूग्ण शस्त्रक्रियेसाठी दाखल झाले होते त्यापैकी ४४५ रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,५ एचआयव्ही आणि हिपॅटायटिस-बी बाधित रुग्णांवरही सर्व आवश्यक सुरक्षा उपायांचे पालन करून यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे गंभीर संसर्गजन्य आजार असलेल्या रुग्णांनाही सुरक्षित व गुणवत्तापूर्ण उपचाराचा लाभ मिळाला.या अभियानामध्ये नेत्र विभागासोबतच इतर विविध विभागांतील रुग्णांचीही तपासणी करण्यात येत असून अनेक रुग्णांना योग्य उपचार व आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या रुग्णांना जळगाव येथील रुग्णालयात दाखल करून मोफत अथवा सवलतीच्या दरात उपचार करण्यात आले.ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे तसेच दृष्टीदोषाने त्रस्त रुग्णांसाठी हे अभियान मोठा दिलासा ठरत आहे. रावेर तालुका मोतीबिंदूमुक्त करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.या अभियानासाठी डॉ. एन एस आर्विकर,डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची विशेष टीम कार्यरत आहे. यात मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराचे समन्वय डॉ. नि. तु. पाटील, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयुरी निलावड, डॉ. निखिल चौधरी, डॉ. संकेत पाटील, डॉ. नेहा नारखेडे, डॉ. शुभम भारसाकळे, डॉ. जतिन बाविस्कर, डॉ. उर्मी गायकवाड, डॉ. अनिष कांदळगावकर, डॉ. अभिजीत काकड, डॉ. दिव्या पोखरणकर, डॉ. मुग्धा बिचकर, डॉ. किर्ती महाजन, डॉ. ऋतुजा चव्हाण, डॉ. रिया गोरे, डॉ. गौरव पाटील, डॉ. वैष्णव व्यवहारे आणि डॉ. अश्विनी काकडे यांचा समावेश आहे. तसेच सबा शेख, प्रतिक्षा सुटे, तृप्ती भोयरकर, स्वाती खरे, खुशी कांबळे आणि संजय महाजन यांनीही अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अभियानाच्या अंतिम टप्प्यात आता रावेर शहरात प्रभागानुसार दि २८ व ३० मे शिबिर होणार असून नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रावेर तालुक्यात राबविण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया अभियानाला नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे एचआयव्ही व हिपॅटायटिस-बी बाधित रुग्णांवरही सर्व सुरक्षा उपायांचे पालन करून सुरक्षित शस्त्रक्रिया करण्यात आल्या. भविष्यातही ग्रामीण भागात अशाच आरोग्यसेवा अभियानांना प्राधान्य देत ‘मोतीबिंदूमुक्त रावेर’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. माजी खा.डॉ उल्हास पाटील अध्यक्ष गोदावरी फॉउंडेशन जळगाव.

ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू नागरिकांपर्यंत अत्याधुनिक आरोग्यसेवा पोहोचवणे हीच आमची खरी सामाजिक बांधिलकी आहे. रुग्णांना तपासणीपासून शस्त्रक्रिया आणि पुढील उपचारांपर्यंत संपूर्ण सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आतापर्यंत हजारो रुग्णांची तपासणी करून शेकडो यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा स्पष्ट दृष्टी मिळाली आहे.रूग्णांचे समाधान हीच आमच्या कामाची पावती आहे.
मोतीबिंदू मुक्त रावेर तालुका शिबिराचे समन्वय डॉ. नि. तु. पाटील,

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button