Social

तणावमुक्तीतून निरोगी जीवनशैली अंगीकारा : हेमंतकुमार भदाणे

तणावमुक्तीतून निरोगी जीवनशैली अंगीकारा : हेमंतकुमार भदाणे

श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

अमळनेर | प्रतिनिधी

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तणाव वाढत असून, फास्टफूडच्या वाढत्या वापरामुळे आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे तणावमुक्त राहण्यासाठी सकारात्मक विचारसरणी आणि सात्त्विक आहाराचा अवलंब करणे आवश्यक असून, त्यातूनच निरोगी जीवनशैली अंगीकारता येईल, असा सल्ला जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी दिला.

येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवारी (दि. १८ जुलै) एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर विविध उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व आणि मंदिरामार्फत राबविण्यात येणाऱ्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.

मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी अध्यक्ष डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची तसेच मंदिरातील पूजाविधींची माहिती दिली.

यावेळी अमळनेरच्या सीडीपीओ हेमलता पाटील, पर्यवेक्षिका सुजाता चौधरी, भाग्यश्री पाटील, प्रीती देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेस वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रीती देवरे यांनी मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button