भडगाव शहरातील प्रलंबित शासकीय जमिनींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

भडगाव शहरातील प्रलंबित शासकीय जमिनींचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक
भडगाव( प्रतिनिधी)
भडगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शासकीय जमिनींच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या उद्देशाने जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कार्यसम्राट आमदार किशोर पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आली असून, शहराच्या भविष्यातील विकास आराखड्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
बैठकीत भडगाव शहरातील वडधे, कराब, पेठ आणि यशवंतनगर परिसरातील विविध शासकीय जमिनींच्या मालकी, हस्तांतरण व विकासाशी संबंधित प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. शहराच्या विकासकामांसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, प्रलंबित प्रशासकीय अडचणी दूर करणे आणि भविष्यातील विकास प्रकल्पांना गती देणे, यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील जागा नगरपरिषदेच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच भगोटाधारक ग्रामस्थांच्या जागांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याबाबतही सहमती दर्शविण्यात आली. शहरातील वाढती लोकसंख्या आणि प्रशासनाच्या गरजा लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आली. यामुळे भविष्यात नागरिकांना वाहनसंबंधित सेवांसाठी अन्य शहरांवर अवलंबून राहावे लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. भडगाव शहरातथोर राष्ट्रपुरुष व महान विभूतींच्या स्मारकांसाठी योग्य जागा उपलब्ध करून त्यांचे प्रेरणादायी स्मारक उभारण्याबाबतही सकारात्मक विचारविनिमय झाला. तसेच शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या सुकी नदीच्या पात्रातील जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळवून त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा, उद्यान, विरंगुळा केंद्र तसेच अन्य विकासात्मक प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीनेही चर्चा करण्यात आली. या बैठकीत भविष्यातील विकास आराखड्याला गती देण्यासाठी विविध प्रशासकीय विषयांवर निर्णयात्मक चर्चा झाली असून, अनेक प्रश्न मार्गीलागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यामुळे भडगाव शहराच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे. बैठकीस जिल्हाधिकारी रोहन घुगे, प्रांताधिकारी भुषण अहीरे, तहसीलदार शितल सोलाट, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश पाटील, मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे, लोकनियुक्त नगराध्यक्षा रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेते लखीचंद पाटील, नगरसेवक युवराज पाटील, विजयकुमार भोसले, जगन भोई, देवा आहीरे, संतोष महाजन, रावसाहेब पाटील तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.





