
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील विविध रस्ते व पदपथांच्या विकासकामांदरम्यान झाडांच्या बुंध्यालगत करण्यात आलेले काँक्रिटीकरण हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. नगरसेवक अरविंद देशमुख यांनी याबाबत महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदन देऊन नियमबाह्य काँक्रिटीकरणामुळे झाडांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित विभागाला तातडीने कारवाईचे निर्देश दिल्याने शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली.
देशमुख यांनी सादर केलेल्या निवेदनात झाडांच्या बुंध्यालगत काँक्रिट टाकल्याने मुळांना हवा, पाणी व आवश्यक पोषक घटक मिळत नसल्याने झाडे कमकुवत होण्याचा धोका वाढत असल्याचे नमूद केले होते. तसेच भविष्यात मुसळधार पाऊस किंवा वादळी वाऱ्यांमध्ये अशी झाडे कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले होते. या निवेदनासोबत शहरातील विविध ठिकाणांची छायाचित्रेही जोडण्यात आली होती.
आयुक्तांच्या निर्देशानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकाऱ्यांनी शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या बुंध्यांभोवतीचे काँक्रिट काढण्यास सुरुवात केली. झाडांच्या मुळांभोवती आवश्यक तेवढी मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून भविष्यात पुन्हा काँक्रिट मुळांपर्यंत पोहोचू नये यासाठी संरक्षक गोलाकार जागाही तयार करण्यात येत आहे. त्यामुळे झाडांच्या मुळांना नैसर्गिकरीत्या हवा, पाणी व पोषक घटक मिळण्यास मदत होणार आहे.
शहराचा विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावा, अशी भूमिका नगरसेवक देशमुख यांनी मांडली. झाडांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकतात. त्यामुळे विकासकामांमध्ये वृक्षसंवर्धनाचे निकष काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.
महापालिकेने या विषयाची तातडीने दखल घेत प्रत्यक्ष मैदानात उतरून कार्यवाही सुरू केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाने उचललेले हे पाऊल स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
यावेळी नगरसेवक अरविंद देशमुख यांनी महानगरपालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे आभार मानले. त्यांनी उर्वरित भागांचीही पाहणी करून ज्या ठिकाणी झाडांच्या बुंध्यालगत नियमबाह्य काँक्रिटीकरण झाले आहे, तेथेही अशीच कारवाई करण्याची मागणी केली. तसेच भविष्यात विकासकामांमध्ये पर्यावरण संरक्षणाचे नियम पाळले जावेत आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच “पर्यावरण बचाव मोहीम” अंतर्गत नागरिकांनी झाडांच्या बुंध्यालगतचे काँक्रिटीकरण, बेकायदा वृक्षतोड किंवा पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या प्रकारांची माहिती छायाचित्रांसह प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींना द्यावी, असे आवाहनही देशमुख यांनी केले. नागरिक आणि प्रशासन यांच्या संयुक्त सहभागातूनच जळगाव अधिक हरित, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहर बनू शकते, असे त्यांनी सांगितले.






