Social

जळगाव शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले; गांधी मार्केट जलमय, दुकानदारांचे नुकसान

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत

जळगाव शहरासह जिल्ह्याला पावसाने झोडपले; गांधी मार्केट जलमय, दुकानदारांचे नुकसान

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचले, जनजीवन विस्कळीत

जळगाव | प्रतिनिधी

हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पावसाने धुवाधार हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले, तर ग्रामीण भागातही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

गांधी मार्केटमध्ये पाणीच पाणी

जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी पेठ असलेल्या गांधी मार्केटमध्ये तळघरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने अनेक दुकानांमधील मालाचे नुकसान झाले. पाणी उपसण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू होती. अचानक आलेल्या पावसामुळे व्यापारावरही मोठा परिणाम झाला.

गांधी मार्केटमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार राजूमामा भोळे, महापालिका आयुक्त आदित्य जीवने आणि महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांशी संवाद साधला. पाणी उपसण्याचे काम तातडीने करण्याबरोबरच नागरिकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

धरणांमध्ये पाणीसाठा वाढला

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर,गिरणा या प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून काही धरणे पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहेत. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेचे नागरिकांना आवाहन

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेने नागरिकांसाठी २४ तास कार्यरत आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. शहरात पाणी साचणे, झाडे पडणे, नाले तुंबणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी ०२५७-२२३७६६६ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन महापालिकेच्या आपत्कालीन विभागाने केले आहे.

प्रशासनाचे आवाहन

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविताना खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button