Other

टाळ-मृदुंगाच्या गजरात संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा

टाळ-मृदुंगाच्या गजरात संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा

भव्य पालखी सोहळ्यात विठ्ठल नामाचा जयघोष; महिला भगिनींच्या लेझीमसदृश पथकासह संतांची मांदियाळी ठरली आकर्षण

जळगाव : वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्था संचलित युवक व महिला मंडळ तसेच शहरातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (११ ऑगस्ट) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. टाळ-मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि भव्य पालखी सोहळ्यामुळे परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

माजी महापौरांच्या हस्ते पालखी पूजन

समाज मंदिर येथे संत नामदेव महाराजांच्या मूर्तीचे व पालखीचे पूजन माजी महापौर सीमाताई भोळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आकर्षक बग्गीतून संत नामदेव महाराजांची पालखी काढण्यात आली. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषात सुरू झालेली पालखी पांझरा पोळ चौक ते लेवा भवन या मार्गाने मार्गक्रमण करीत लेवा भवन येथे पोहोचली. यावेळी सुमारे १,५०० समाजबांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शीख बांधवांकडून पुष्पवृष्टीने स्वागत

पालखी सोहळ्याचे श्री गुरुद्वारा साहेब येथे शीख बांधवांच्या वतीने भव्य पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या स्वागताने सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे दर्शन घडले.

महिला व बालिकांचा सहभाग ठरला लक्षवेधी

पालखी सोहळ्यात महिला भगिनी आणि लहान मुलींचे विशेष पथक हे प्रमुख आकर्षण ठरले. टाळ-मृदुंगाच्या साथीने संतांची मांदियाळी सादर करणारा सजीव देखावा साकारण्यात आला. समाजातील कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्त्यांनी आकर्षक गाजरी रंगाचे नेहरू शर्ट आणि पांढरा पायजमा परिधान केला होता, तर महिला भगिनींनी हिरव्या रंगाच्या पैठणी परिधान करून पालखी सोहळ्याची शोभा वाढविली.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमस्थळी संत नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवक अमर जैन, नरेंद्र पाटील, सुप्रीम कंपनीचे रविकिरण कोंबडे तसेच समाजाध्यक्ष विवेक जगताप यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी माजी महापौर सीमाताई भोळे, दिलीप अण्णा भांडारकर, जिल्हाध्यक्ष बंडूनाना शिंपी, रवींद्र कापुरे, पी. टी. शिंपी, रघुनाथ कोल्हटकर यांच्यासह शहरातील विविध संस्थांचे अध्यक्ष, शाखाध्यक्ष व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजबांधवांचा सत्कार

कार्यक्रमात विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये राजेंद्र सोनवणे, मयुरेश जगताप, दीपक शिंपी, रुपेश जगताप व नेरपगार यांचा गौरव करण्यात आला.

संत नामदेव-गुरुनानक चौकाची मागणी

यावेळी समाजाच्या वतीने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती सभापती यांना निवेदन देण्यात आले. जळगाव शहरातील एका प्रमुख चौकाला ‘संत नामदेव-गुरुनानक देव चौक’ नाव देण्यात यावे तसेच शहरातील उड्डाणपुलाला संत नामदेव महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

डिजिटल जनगणना फॉर्मचे लोकार्पण

समाजाची डिजिटल ऑनलाइन खानदेसुमारी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या फॉर्मचे लॉन्चिंग माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. या उपक्रमामुळे समाजाची माहिती डिजिटल स्वरूपात संकलित करण्यास मदत होणार आहे.

कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून सोहळा यशस्वी

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, अनिल खैरनार, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, गणेश सोनवणे, निलेश जगताप, सुनील सोनवणे, सुनील गांगुर्डे, महेश शिंपी, केतन मेटकर, आनंद शिंपी, भरत सोनवणे, देविदास शिंपी, युवक अध्यक्ष हेमंत शिंपी, सचिव योगेश शिंपी, महिला अध्यक्ष माधुरी शिंपी, प्रमोद निकुंभ, राजेंद्र सोनवणे, मुकुंद मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, सुरेश सोनवणे, बापू खैरनार, राहुल शिंपी, जितेंद्र शिंपी, सुमित अहिराव यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button