शनीपेठ मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एकाच ठिकाणी ३० गडकिल्ले!


शनीपेठ मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात एकाच ठिकाणी ३० गडकिल्ले!
गणेशोत्सवात छत्रपती शिवरायांच्या दुर्गवैभवाचे दर्शन; दुर्गसंवर्धनासह स्वच्छतेचा संदेश देणार
जळगाव, दि. ८ : शहरातील मानाचे आणि शिस्तबद्धतेसाठी ओळख असलेल्या शनीपेठ मित्र मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात ऐतिहासिक दुर्गजागर करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३० गडकिल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृतींचा भव्य देखावा हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
मंडळाच्या ५० व्या वर्षाचे औचित्य साधून साकारण्यात येणाऱ्या या देखाव्यातून छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास, त्यांचे शौर्य आणि दूरदृष्टी नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात हा देखावा नागरिकांसाठी खुला राहणार असून, जळगावकरांना एकाच ठिकाणी महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाचे दर्शन घेता येणार आहे.
दुर्गसंवर्धनासह स्वच्छतेचा जागर
गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारशाचे जतन याबाबत जनजागृती करण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे. दुर्गभ्रमंतीदरम्यान स्वच्छता राखावी, गडकिल्ल्यांचे पावित्र्य व ऐतिहासिक महत्त्व जपावे, तसेच युवकांनी दुर्गसंवर्धनाच्या कार्यात सहभागी व्हावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात येणार आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी नवी कार्यकारिणी
मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी प्रशांत मधुकर पाटील यांची निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी शांताराम शंकर पाटील व प्रभाकर नारायण महाले, सचिव संजय लक्ष्मण देवरे, कार्याध्यक्ष अनिल अमृत वाणी व मुकुंदा भागवत सोनवणे, उत्सव समिती प्रमुख जगदीश भास्कर नेवे, तर मिरवणूक प्रमुख म्हणून देविदास रमेश जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
जनजागृतीपर देखाव्यांची परंपरा
शनीपेठ मित्र मंडळाने यापूर्वीही गणेशोत्सवातून विविध सामाजिक व जनजागृतीपर सजीव देखावे साकारले आहेत. धार्मिक आणि सामाजिक विषयांबरोबरच खाटू श्याम बाबा, कृष्ण जन्म यांसारख्या आकर्षक आरासही मंडळाने साकारल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग हे मंडळाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी बाप्पाचे आगमनही उत्साहात करण्यात आले. आता ३० गडकिल्ल्यांचा भव्य देखावा पाहण्यासाठी जळगावकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.







