Crime

प्रेमसंबंधातून १७ वर्षीय तरुणाचा खून, चुलत भाऊ गंभीर जखमी; देहूरोडमध्ये खळबळजनक घटना

प्रेमसंबंधातून १७ वर्षीय तरुणाचा खून, चुलत भाऊ गंभीर जखमी; देहूरोडमध्ये खळबळजनक घटना

देहूरोड (प्रतिनिधी) – एका अल्पवयीन मुलीवर असलेले दोन तरुणांचे प्रेम जीवघेणे ठरले. प्रेमसंबंधात अडथळा ठरतो म्हणून एका तरुणाने प्रतिस्पर्ध्याचा खून केला, तर त्याचा चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही खळबळजनक घटना बुधवार, ११ जून रोजी रात्री साडेदहा वाजता देहूरोडमधील थॉमस कॉलनी परिसरात घडली.

खून झालेल्या तरुणाचे नाव दिलीप मौर्या (वय १७, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे आहे. तर त्याचा चुलत भाऊ अरूण सुखराम मौर्या (वय १५) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अरुणने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणात सनी सिंग (रा. थॉमस कॉलनी, मुळ गाव – गंभीरपूर, ता. शिवना, जि. गोपालगंज, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

सनी सिंग आणि दिलीप मौर्या यांचे एका मुलीशी प्रेमसंबंध होते. दिलीप तिच्याशी अधिक जवळीक साधत असल्याने सनी याच्या मनात राग निर्माण झाला. बुधवारी रात्री सनीने दिलीपला भेटण्यास बोलावले. रात्रीची वेळ असल्याने दिलीपने आपला चुलत भाऊ अरुण याला सोबत नेले.

थॉमस कॉलनी परिसरात सनी आणि दिलीपमध्ये प्रेमसंबंधावरून जोरदार वाद झाला. त्या वादातून संतप्त सनीने चाकूने दिलीपच्या गळ्यावर वार केला. अरुण मध्ये पडला असता, त्याच्यावरही छातीवर वार करण्यात आला. त्यानंतर सनीने घटनास्थळावरून पळ काढला.

गंभीर जखमी अरुणला तत्काळ देहूरोड कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दिलीप मौर्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून, लवकरच त्याला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button