सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ

सेवा संकल्प अभियानांतर्गत आसराबारी येथे विशेष शिबिर; विविध शासकीय योजनांचा नागरिकांना लाभ
जळगाव,: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांच्या निर्देशानुसार, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत थेट एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल यांच्या वतीने आसराबारी, ता. यावल येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत विशेष लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना योजनांची माहिती, विविध दाखल्यांचे वितरण, आरोग्य तपासणी तसेच शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी महसूल विभागामार्फत १० जातीचे दाखले, ग्रामविकास विभागामार्फत ३० मनरेगा जॉब कार्ड, १० जन्म दाखले, पुरवठा विभागामार्फत १४ रेशन कार्ड वितरित करण्यात आले. आदिवासी विकास विभागामार्फत बचत गट व वैयक्तिक लाभार्थ्यांना योजनांचे लाभ देण्यात आले.
कृषी विभागामार्फत महिला शेतकरी व सेंद्रिय शेती योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागामार्फत २५ गोल्डन आभा व आभा कार्डसंदर्भातील सेवा देण्यात आली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून एकूण १०१ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण योजनेंतर्गत पाच लाभार्थ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय भूमी अभिलेख, महसूल व इतर विभागांमार्फत नागरिकांना विविध सेवा आणि मार्गदर्शन देण्यात आले.
शिबिराच्या माध्यमातून पाणीपुरवठा, रस्ते व इतर पायाभूत सुविधांचाही आढावा घेण्यात आला. यामुळे दुर्गम व आदिवासी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यास मदत झाली.
यावेळी प्रांताधिकारी बबनराव काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रवीण दाभाडे यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते







