
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘थ्री टी एमआरआय मशीन’चे उद्घाटन
रुग्णसेवेत आमूलाग्र बदल – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव (प्रतिनिधी) – “गेल्या आठ वर्षांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांनी सातत्यपूर्ण प्रगती साधून रुग्णसेवेत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यामुळे रुग्णांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होऊ लागल्या असून ‘थ्री टेस्ला एमआरआय मशीन’ ही त्यातीलच एक महत्त्वाची भर आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
शनिवार, ३ मे रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘थ्री टी एमआरआय मशीन’च्या उद्घाटनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची उपस्थिती होती.
सर्वसुविधायुक्त रेडिओलॉजी विभागाची घडामोड
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना रेडिओलॉजी विभागाचे प्रभारी डॉ. मारोती पोटे यांनी सांगितले की, “गेल्या काही वर्षांत एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन यासारख्या सुविधा उपलब्ध करून आता थ्री टेस्ला एमआरआय मशीनच्या स्थापनेने रेडिओलॉजी विभाग अधिक सक्षम झाला आहे. सुरुवातीला ही सुविधा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी उपलब्ध राहणार असून, पुढे ओपीडीवरील रुग्णांनाही लाभ मिळणार आहे.”
विकसनिधीतून आधुनिक उपकरणांची भर
राज्य आणि केंद्र पुरस्कृत ईडब्ल्यूएस योजनेअंतर्गत २०२३–२४ या आर्थिक वर्षात मंजूर निधीतून थ्री टेस्ला एमआरआय मशीन खरेदी करण्यात आले आहे.
रुग्णसेवेतील प्रगतीचे कौतुक
पालकमंत्री पाटील यांनी महाविद्यालयातील सुविधांचे कौतुक करत, ही यंत्रणा अधिक प्रभावी होण्यासाठी आवश्यक सहकार्याचे आश्वासन दिले. आमदार राजूमामा भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांनीही रुग्णसेवेच्या विस्ताराबद्दल समाधान व्यक्त केले. ना. गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या एमआरआय सुविधेमुळे जिल्ह्यातील रुग्णांना परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण सेवा मिळणार असून त्याचा थेट लाभ ग्रामीण रुग्णांपर्यंत पोहोचेल.”
कार्यक्रमास प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रमोहन हरणे, डॉ. इम्रान पठाण, प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, डॉ. संजय चौधरी, जयश्री जोगी व विविध विभागप्रमुख, डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश बारी यांनी तर आभार प्रदर्शन अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी केले.