पंकज बाल संस्कार केंद्रात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा

चोपडा|मिलिंद वाणी : (ता.१३ ऑगस्ट) :पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित पंकज बाल संस्कार केंद्रात दहीहंडी उत्सव आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. लहान चिमुकले कृष्ण-राधेच्या वेशभूषेत सजून आले होते. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माखनचोर कृष्णाच्या रूपात सजलेले बालक व गोपिकांच्या वेषातील मुलींनी सादर केलेल्या रासलीलांनी संपूर्ण परिसर भारावून गेला.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण प्रतिमेच्या पूजनाने झाली. हे पूजन मुख्याध्यापक एम. व्ही. पाटील व विभाग प्रमुख सौ. मीना माळी यांच्या हस्ते करण्यात आले. दहीहंडी फुटताच “गोविंदा आला रे!” च्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.
या उपक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती लाभली. त्यांनी लहानग्यांच्या निरागस सादरीकरणाचे कौतुक केले. “बालपणातच संस्कार आणि भारतीय परंपरेची ओळख करून देणे हा आमचा मुख्य उद्देश आहे”, असे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भावना दीक्षित, छाया बारी, संध्या पाटील, जयश्री हिंगे, अनिता बरहाटे, योगिता कोळी, सुनंदा विसावे, जयश्री महाजन, ज्योती माळी व विजय सोनवणे यांचे विशेष सहकार्य लाभले.






