लळिंग घाटात साधूच्या वेषातील टोळीने कुटुंबाला लुटले; उत्तराखंडातील आरोपींना मोहाडी पोलिसांची अटक

धुळे : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील खासणे गावातील कुटुंब देवदर्शनाहून परतत असताना धुळे महामार्गावरील लळिंग घाटात साधूच्या वेषात आलेल्या टोळीने लुटमारीची घटना घडवली. या प्रकरणातील आरोपी उत्तराखंडमधील असून, मोहाडी पोलिसांनी वेगवान कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
खासणे येथील ललिता नरेंद्र पाटील आपल्या कुटुंबासह घरी परतत असताना घाटात त्यांच्या वाहनाला साधूच्या वेशात असलेल्या व्यक्तीने आडवले. ‘पाणी घ्या आणि आशीर्वाद घ्या’ असे सांगून त्याने सर्वांना गाडीतून खाली उतरवले. कुटुंबीय त्याच्या पाया पडताच, त्याने दोन महिलांना खाली थांबवून अचानक चाकूचा धाक दाखवत त्यांच्याजवळील दागिने हिसकावून घेतले. त्यानंतर ही टोळी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून पसार झाली.
ललिता पाटील यांनी तातडीने मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तपासासाठी निघालेल्या पोलिसांना मुंबई-आग्रा महामार्गावर गस्त घालताना गरताडबारी येथे साधूच्या वेशातील एक संशयित आढळून आला. चौकशीत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आपले नाव जागीरनाथ बाबुनाथ नाथसफेरे (रा. घेसुपुरा, हरिद्वार, उत्तराखंड) असे सांगितले. पुढील तपासात या लूटमारीत गोविंदनाथ कल्लूनाथ नाथसफेरे, सौदागर बाबुनाथ नाथसफेरे, विक्की मोसमनाथ नाथसफेरे व कांता मोसमनाथ नाथसफेरे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी या सर्व आरोपींना अटक करून गुन्ह्यातील स्विफ्ट डिझायर कारही जप्त केली आहे. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. या धाडसी कारवाईबद्दल स्थानिकांतून मोहाडी पोलिसांचे कौतुक होत आहे.






