रावेरच्या लाचखोर भूकरमापकाला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

रावेरच्या लाचखोर भूकरमापकाला ४ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले !
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव, जळगावातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) आज एका मोठ्या कारवाईत भूकरमापकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. एरंडोल तालुक्यातील निंभोरा येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी राजेंद्र रमेश कुलकर्णी (वय ४८), भूकरमापक, भूमी अभिलेख कार्यालय, रावेर, याला ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. मस्कावद (ता. रावेर) येथील एका ३० वर्षीय शेतकऱ्याने ४ मार्च २०२५ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आणि त्यांच्या काकांची मस्कावद येथे सामायिक शेतजमीन असून, त्याच्या मोजमापासाठी त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता.
१८ फेब्रुवारी २०२५ रोजी राजेंद्र कुलकर्णी यांनी शेताचे मोजमाप केले, परंतु मोजमापाच्या खुणा दाखवण्यासाठी ५,५०० रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, कुलकर्णी यांनी हरभऱ्याच्या स्वरूपात लाच देण्यास सांगितले. तक्रारदाराला हे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.पडताळणी दरम्यान, कुलकर्णी यांनी प्रथम ५,५००, नंतर ५,००० आणि अखेरीस ४,००० रुपयांवर तडजोड केली. आज, २६ मार्च रोजी निंभोरा येथे एका शेताजवळ तक्रारदाराकडून ४,००० रुपये लाच स्वीकारताना कुलकर्णी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
या कारवाईत सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, पो. कॉ. राकेश दुसाने आणि पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याने लाच मागितल्यास तात्काळ ०२५७-२२३५४७७ किंवा टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.