

मुलगा मानलेल्या भाच्यानेच मावशीचा घात केला; दागिन्यांसाठी ८५ वर्षीय वृद्धेचा खून
३५ दिवसांनी हत्येचा उलगडा; धुळ्यातून संशयित ताब्यात, सांगाडा व मानवी अवशेष आढळले
जळगाव | प्रतिनिधी
अपत्य नसल्याने ज्या भाच्याला मुलाप्रमाणे मानले, त्याच भाच्याने दागिन्यांच्या हव्यासापोटी ८५ वर्षीय मावशीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पारोळा तालुक्यातील करंजी येथील वैजयंती गणपत माळी यांच्या बेपत्ता होण्याच्या घटनेचा तब्बल ३५ दिवसांनी जळगाव पोलिसांनी छडा लावला. प्रशांत उत्तम माळी याला पोलिसांनी १२ सप्टेंबर रोजी धुळे येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबर रोजी शोधमोहीम राबविल्यानंतर कुजलेले मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला.
३ ऑगस्ट रोजी वैजयंती माळी या करंजी येथील घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्या एकट्याच राहत असल्याने नातेवाइकांनी त्यांचा शोध सुरू केला. ९ ऑगस्ट रोजी पारोळा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर १९ ऑगस्ट रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३८(२) नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, वैजयंती यांचा सख्ख्या बहिणीचा मुलगा प्रशांत माळी हादेखील घटनेनंतर अचानक गायब झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तपासाची दिशा त्याच्याकडे वळली.
सीसीटीव्हीमुळे तपासाला दिशा
पोलिसांनी करंजी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता ३ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे सहा वाजता प्रशांत गावात आल्याचे दिसून आले. त्याचबरोबर वैजयंती माळी घाईघाईने जाताना आणि त्यानंतर एका कारमध्ये बसताना दिसल्याने पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला.
प्रशांतवर कर्ज व उधारी असल्याचे तपासात समोर आले. वैजयंती या त्याला वेळोवेळी आर्थिक मदत करीत असतानाही त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर त्याची नजर असल्याचा संशय तपासात पुढे आला.
खोटे कारण सांगून नेले
पोलिसांच्या तपासानुसार, प्रशांतने वैजयंती यांना खोटे कारण सांगून सोबत नेले. साडूच्या वडिलांचे निधन झाले असून अंत्यविधीसाठी शिरसोलीला जायचे असल्याचे सांगून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर दागिन्यांवरून दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर मुकटी, धुळे परिसरात त्याने कापडाने गळा आवळल्याची माहिती चौकशीत समोर आली.
दागिने घेऊन मृतदेहाची विल्हेवाट
खून केल्यानंतर दागिने काढून घेत मृतदेह कारच्या डिक्कीत ठेवण्यात आला. त्यानंतर तो मुकटी येथील घरी गेला. दुसऱ्या दिवशी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो विविध ठिकाणी फिरत राहिला. याचदरम्यान दागिने सोनाराकडे विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
नंतर रात्री बायपास महामार्गावरील ड्रेनेज पट्ट्यातील सिमेंटच्या गॅपमध्ये मृतदेह टाकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
सांगाड्यामुळे गूढ उकलण्यास मदत
१३ सप्टेंबर रोजी प्रशांतने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी शोधमोहीम राबवली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात कुजलेले मानवी अवशेष आणि सांगाडा आढळून आला. त्यामुळे वैजयंती माळी यांच्या बेपत्ता होण्याचे गूढ उकलण्यास महत्त्वाची मदत झाली आहे. पुढील तपास सुरू आहे.







